Pimpri Crime : अंधश्रद्धेआडून फोनमधील ॲपद्वारे ‘तो’बघत होता खासगी क्षण; भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:00 IST2025-07-01T10:00:22+5:302025-07-01T10:00:57+5:30

मोबाइल ॲक्सेस घेऊन भक्तांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Pimpri Chinchwad crime was watching private moments through an app on his phone, out of superstition | Pimpri Crime : अंधश्रद्धेआडून फोनमधील ॲपद्वारे ‘तो’बघत होता खासगी क्षण; भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Pimpri Crime : अंधश्रद्धेआडून फोनमधील ॲपद्वारे ‘तो’बघत होता खासगी क्षण; भोंदू बाबाला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

पिंपरी : भक्तांच्या मोबाइलमध्ये गुपचूप ॲप डाउनलोड करून मोबाइलचा ॲक्सेस घेत त्यांचे खासगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली. मृत्यूची भीती दाखवत तरुण भक्तांना वेश्या किंवा प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाइल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. या फसवणुकीचा उलगडा भक्ताच्या सायबर तज्ज्ञ मित्रामुळे झाला आहे.

प्रसाद ऊर्फ दादा भीमराव तामदार (२९, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या बाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित तामदार याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बाबा बावधन परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चालवत होता. ‘आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे’, असा दावा करत तो भक्तांना ‘तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे’ असे सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता. यानंतर मंत्रजाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांत असलेल्या ठिकाणी बसवून त्यांचा मोबाइल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाइलमध्ये गुपचूप ‘एअर ड्रॉइड कीड’ हे हिडन ॲप डाउनलोड करून ठेवत असे. हे ॲप बॅकग्राउंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्तांचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते. ॲपच्या साहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले, याबाबत माहिती सांगत होता. यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता.

या प्रकाराचा सर्वांत गंभीर मुद्दा म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना ‘प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा’ असा सल्ला दिला. विशेष म्हणजे, शरीर सबंध सुरू असताना मोबाइल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाइल विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगत असे. त्याद्वारे मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत आणि त्याचे चित्रीकरण करत होता.

दरम्यान, एका तरुण भक्ताचा मोबाइल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी मित्राकडे दिला. संबंधित मित्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाइल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन ॲप सापडले. त्याच्या मदतीने मोबाइल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा संबंधित तरुणाला आठवले की, आपण मोबाइल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्याही मोबाइलमध्ये तेच ॲप असल्याचे निष्पन्न झाले.
आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुण भक्ताने थेट डायल ११२ क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले. अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, सायबरतज्ज्ञांच्या मदतीने संशयित बाबाच्या मोबाइल आणि वापरलेल्या ॲपची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार, बाबावर गुन्हा दाखल केला. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू आहे.

Web Title: Pimpri Chinchwad crime was watching private moments through an app on his phone, out of superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.