खंडणीसाठी टोळक्याकडून कोयता हवेत फिरवत दहशत;पोलिस तक्रारीसाठी चाललेल्या तरुणास रस्त्यात अडवून मारहाण
By नारायण बडगुजर | Updated: March 8, 2025 16:53 IST2025-03-08T16:51:10+5:302025-03-08T16:53:03+5:30
खंडणीसाठी टोळक्याकडून कोयता हवेत फिरवत दहशतपोलिस तक्रारीसाठी चाललेल्या तरुणास रस्त्यात अडवून मारहाण

खंडणीसाठी टोळक्याकडून कोयता हवेत फिरवत दहशत;पोलिस तक्रारीसाठी चाललेल्या तरुणास रस्त्यात अडवून मारहाण
पिंपरी : सराईत गुन्हेगाराला सोडविण्यासाठी दहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या कार्यालयात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेला तरुण आपल्या भावासोबत तक्रार देण्यासाठी चालला असता पुन्हा टोळक्याने रस्त्यात अडवून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली. काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये गुरुवारी (दि. ६) ही घटना घडली.
सचिन बाबाजी काळे (३८, रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी शुक्रवारी (दि. ७) याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमोल खेडेकर, आदित्य चोथे, गणेश बोरुडे, शुभम खेडेकर, बंड्या सगर, संतोष चव्हाण (सर्व रा. काळेवाडी) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसांपूर्वी अमोल खेडेकर याने फिर्यादी सचिन काळे यांच्याकडे डी भाई (प्रशांत दिघे) याला सोडविण्यासाठी दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली, ते पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून खेडेकर, चोथे, बोरुडे यांनी आपसांत संगणमत करून गुरुवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी सचिन काळे यांच्या कार्यालयामध्ये घुसले.
फिर्यादी सचिन यांचा भाऊ राहुल काळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमोल खेडेकर याने आपल्या हातातील बाटली फेकून मारली. याबाबत सायंकाळी सात वाजता फिर्यादी तक्रार देण्यासाठी जात असताना संशयितांनी आरडाओरडा, शिवीगाळ केली. बंड्या सगर याने हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच संशयितांनी फिर्यादी सचिन, भाऊ राहुल, शुभम काळे, निहाल नदाफ व उमेश जोगदंड यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व बंड्या सगर याने कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. संघटीत गुन्हेगारी करून संशयितांनी दहशत निर्माण केली.