bomb threat : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
By नारायण बडगुजर | Updated: March 11, 2025 14:54 IST2025-03-11T14:51:23+5:302025-03-11T14:54:10+5:30
- महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला.

bomb threat : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
पिंपरी : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. महाविद्यालय प्रशासनाला मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास हा ई-मेल मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक/नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण महाविद्यालयात पाहणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने हा ‘ई-मेल’ खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
रावेतचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली.
पोलिसांनी तत्काळ संपूर्ण महाविद्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेर बाहेर काढून महाविद्यालय व परिसरात तपासणी सुरू केली. त्यामुळे अफवांना उधाण आले. पालकांनीही महाविद्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांच्या बॉम्ब शोध पथक आणि सायबर सेलच्या मदतीने महाविद्यालय परिसराची तपासणी केली.
यापूर्वीही फेक ई-मेल
पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना यापूर्वीही अशा स्वरूपाचे धमकीचे मेल मिळाले आहेत. त्यावेळीही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना सूचना करण्यात आली आहे.
ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू
पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे. अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.