Pimpari-chinchwad: महापालिका रुग्णालयांत बिल घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:05 IST2026-03-22T15:04:29+5:302026-03-22T15:05:19+5:30
- आकुर्डी व भोसरी रुग्णालयांत ‘कार्बन कॉपी ट्रिक’ने फसवणूक : चौकशी सुरू; गोरगरीब रुग्णांचे आर्थिक शोषण; कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संश असून, नोटिसा बजावल्या

Pimpari-chinchwad: महापालिका रुग्णालयांत बिल घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार
पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या बिलात गंभीर गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखवून कार्बन कॉपीवर कमी रक्कम नोंदवून लाखो रुपये लाटले गेले आहेत. आकुर्डीतील हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात हा प्रकार समोर आला असून, याची चौकशी सुरू झाली आहे.
महापालिकेच्या आठ मोठ्या रुग्णालयांसह ३० दवाखान्यांतून गोरगरीब रुग्णांना उपचार मिळतात. आकुर्डी रुग्णालयात प्रथम हे उघड झाले. रुग्णांना १०० रुपयांचे बिल दिले असल्यास कार्बन कॉपीवर फक्त २५ रुपये दाखवून उर्वरित रक्कम खिशात घातली जात होती. अशा प्रकारे दररोज छोट्या-छोट्या रकमांमधून सुमारे नऊ लाख २५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. रुग्णालय प्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर वैद्यकीय विभागाला अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर सर्व रुग्णालयांची तपासणी केली असता भोसरी रुग्णालयातही असाच प्रकार आढळला. तेथेही लाखोंचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात आकुर्डी रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचारी आणि तीन कंत्राटी कर्मचारी संशयित असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयातही असे गैरव्यवहार उघडकीस आले होते. तरीही इतर ठिकाणी हे सुरू राहिले. या प्रकारामुळे महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तातडीने पारदर्शक ऑनलाइन बिलिंग सुरू करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
ऑनलाइन बिलिंग यंत्रणा कधी?
रोख व्यवहार आणि पेपर बिलिंगमुळे गैरसुविधा होत असून, रुग्ण व नातेवाईक संतप्त आहेत. महापालिकेत १ एप्रिल २०२५ पासून पेपरलेस कारभार सुरू असला तरी रुग्णालयांत अद्याप ऑनलाइन बिलिंग व पेमेंट सुरू झालेले नाही. यामुळे कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वारंवार वाद होतात.
आकुर्डी व भोसरी रुग्णालयांत बिल अफरातफर उघडकीस आली आहे. सर्व रुग्णालयांची तपासणी केली असून, चौकशी अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर केला जाईल. दोषी कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. लवकरच सर्व रुग्णालयांत ऑनलाइन व्यवहार सुरू होतील. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
एका रुग्णाची दोन बिले होती. त्यातील फक्त एकच भरले गेले. आम्ही त्याला उर्वरित रक्कम भरण्यास सांगितले आणि पावत्या तपासल्या, तेव्हा आम्हाला बिलिंगमध्ये तफावत आढळून आली. याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. - डॉ. बाळासाहेब होडगर, प्रमुख, हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय