Purandar Airport : भूसंपादनाच्या संमतीसाठी उरलेत केवळ २ दिवस, विमानतळासाठी आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक जमिनीची शेतकऱ्यांची संमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:39 IST2025-09-17T17:39:13+5:302025-09-17T17:39:54+5:30
या नियोजित विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठीची संमतिपत्रे घेण्यास जिल्हा प्रशासनाने २६ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे.

Purandar Airport : भूसंपादनाच्या संमतीसाठी उरलेत केवळ २ दिवस, विमानतळासाठी आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक जमिनीची शेतकऱ्यांची संमती
पुणे :पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनास संमती देण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर केवळ २० दिवसांतच ७० टक्क्यांहून अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. संमती देण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असून १९ सप्टेंबरनंतर आठवडाभरात जमीन मोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत संमतिपत्रे सादर दहा टक्के जागेचा परतावा निश्चित करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुरंदर येथील सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. या नियोजित विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठीची संमतिपत्रे घेण्यास जिल्हा प्रशासनाने २६ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. मुदतीत संमतिपत्रे सादर करणाऱ्या जागामालकांना दहा टक्के विकसित भूखंडाचा परतावा देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत २ हजार एकरांहून अधिक जागेची संमतिपत्रे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत. भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण जागेच्या जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक जागेची संमतिपत्रे मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने त्या पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, संमतिपत्रे सादर करण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. या मुदतीत शेतकऱ्यांनी संमतिपत्रे सादर करून दहा टक्के विकसित भूखंडाचा मोबदला घ्यावा. ही मुदत संपल्यानंतर आठ दिवसांनी विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोजणीस सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. १६) विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या सातही गावांत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.