हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:43 IST2025-07-10T13:42:57+5:302025-07-10T13:43:55+5:30
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीला यश

हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे राज्य शासनाने लक्ष दिले आहे. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी (दि. १०) मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. ही बैठक दुपारी १:४५ वाजता विधानभवनात होणार असून, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, आमदार शंकर जगताप आणि महेश लांडगे, पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी - चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्त, महामार्ग-मेट्रो आणि एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वाहतूक सुसूत्रीकरणावर भर
या बैठकीत हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रमुख रस्त्यांचा विस्तार, नवीन जोडरस्त्यांची निर्मिती, उड्डाणपूल व पूल प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि पार्किंगची अंमलबजावणी यावर चर्चा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने बैठक आयोजित केली आहे. नागरिकांना या बैठकीतून ठोस निर्णय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहतूक नियोजनाबाबत प्रभावी निर्णय घेतले गेले, तर हिंजवडी परिसरातील हजारो आयटी कर्मचारी, रहिवासी आणि वाहनचालकांसाठी दिलासा मिळणार आहे. - शंकर जगताप, आमदार