हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:42 IST2025-07-13T18:39:50+5:302025-07-13T18:42:17+5:30

- आराखडा तयार करून गुरुवारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Pick up those who come in the way of road works; file cases against them | हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील ओढे-नाले आणि पावसाळी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्यासाठी अनधिकृत बांधकामे पाडा, त्याबाबत एक महिन्याचा आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि इतर विभागांना दिले. त्यानुसार गुरुवारपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये अजित पवार यांनी रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी पाहणी केली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आढावा बैठक झाली. त्यावेळी अजित पवार यांनी हे निर्देश दिले. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, मनोज पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

डाॅ. योगेश म्हसे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क परिसरात ओढ-नाले अरुंद झाले आहेत, तसेच काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल. दररोज किती बांधकामांवर कारवाई करणार आणि कोणत्या दिवशी किती बांधकामे पाडली, याबाबत हा आराखडा राहणार आहे. त्याअंतर्गत हिंजवडी, माण, मारुंजी या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महिनाभरात कारवाई करण्यात येणार आहे. नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह कोणी बदलला, बांधकामास कोणी परवानगी दिली याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

‘नवीन रस्त्यांची आखणी करा’
हिंजवडी भागात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच रिंगरोडच्या कामाबाबत डॉ. म्हसे यांनी बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आराखड्यातील रस्ते तसेच नवीन रस्त्याची आखणी करत यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.


प्रस्तावित रस्त्यांच्या निविदा काढणार

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पीएमआरडीएतर्फे रस्ते प्रस्तावित आहेत. त्यांच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. सर्व रस्ते काँक्रीटचे होतील, अशी माहिती डाॅ. म्हसे यांनी दिली.

Web Title: Pick up those who come in the way of road works; file cases against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.