छातीत कफ; ५ दिवसांचे अँटिबायोटिक्स, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:07 IST2026-02-10T10:06:49+5:302026-02-10T10:07:20+5:30
सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरू आहेत

छातीत कफ; ५ दिवसांचे अँटिबायोटिक्स, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती
पुणे : राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याच्या कारणास्तव सोमवारी (दि. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी प्रतिभा पवार, मुलगी खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे उपस्थित होते. अर्धा तासांच्या अंतराने नातू रोहित पवार रूग्णालयात पोहचले. रुबीचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
प्राथमिक तपासणीत काही चाचण्या सामान्य असल्याचे निदर्शनास आले असून, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एक दिवस तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. अभिजित लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांतील सततच्या धावपळीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. छातीत थोडा कफ असल्याने श्वसन तपासणीही करण्यात आली आहे. सध्या त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले असून ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नाही. पुढील तपासण्यांचे अहवाल लवकरच उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनीही यावेळी माहिती देताना सांगितले की, गेल्या दहा-बारा दिवसांत शरद पवार यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती. त्यामुळे थकवा आणि थोडासा श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवल्याने त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व तपासण्यांचे प्राथमिक अहवाल सामान्य आहेत. सुप्रिया सुळे यांनीही डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णालयाच्या प्रोटोकॉलनुसारच उपचार व्हावेत, अशी सूचना केली आहे. उर्वरीत तपासणी अहवालांनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे.
Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. 🙏
— Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026
खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्वीट
बाबांना छातीत कफ झाला आहे. डॉक्टरांनी पाच दिवसांचा अँटिबायोटिक्सचा उपचार सुचविला आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचार सुरू असल्याने काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तुमच्या शुभेच्छा आणि सतत पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार.