बारामतीत अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:50 IST2025-12-28T17:49:09+5:302025-12-28T17:50:01+5:30
- उद्योजक गौतम अदानींच्या हस्ते देशातील पहिल्या जागतिक ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन

बारामतीत अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर
बारामती : राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसात विशेष जोर मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारलेल्या देशातील पहिल्या जागतिक ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी उद्योजक गौतम अदानी हे त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती अदानी यांसह उपस्थित होते. यावेळी सर्व पवार कुटुंब अनेक दिवसांनी एकाच व्यासपीठावर बारामतीत एकत्र आलेले दिसले.
बारामतीत रविवारी (दि. २८) आयोजित उद्घाटन कार्यक्रमासाठी अदानी दाम्पत्य खास विमानाने बारामती विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर आमदार रोहित पवार यांनी अदानी दाम्पत्याचे स्वागत केले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गौतमभाई वेलकम टू बारामती’ असे म्हणत त्यांचे स्वागत केले. यावेळी अदानी दाम्पत्य कारमध्ये मागील सीटवर बसले, आमदार रोहित पवार स्वतः सारथी बनून कार चालविण्यास पुढे आले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार रोहित पवार यांच्या शेजारील सीटवर पुढे बसले. त्यानंतर, दोन्ही ज्युनिअर काका - पुतण्यांसह अदानी दाम्पत्य विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटरमध्ये दाखल झाले. या ठिकाणी पोहचल्यानंतर गौतम अदानी शरद पवार यांच्यासमोर नतमस्तक झाले. अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांसह त्यांनी सेंटरची पाहणी करून माहिती घेतली.
यानंतर अदानी आणि त्यांची पत्नी विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात दाखल झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या निमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार एकत्र उपस्थित होते. अदानींच्या पत्नी डॉ. प्रीती अदानी यांचे स्वागत करण्यासाठी सूत्रसंचालकांनी खासदार सुप्रिया सुळेंचे नाव पुकारले. मात्र, खासदार सुळे यांनी स्वतः मागे हटून खासदार सुनेत्रा पवार यांना पुढे येऊ देत त्यांच्याकडून सत्कार करण्याचा मान दिला. यावेळी अनेक दिवसांनी एकत्र आलेले पवार कुटुंब बारामतीकरांच्या कौतुकाचा विषय ठरले. तसेच उद्योजक अदानी यांचे भाषण सुरू असताना ते शरद पवार यांच्या शेजारील खुर्चीवर जाऊन बसले. काही वेळेच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा त्यांच्या खुर्चीवर बसले. अदानी दाम्पत्याच्या स्वागतासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. बारामती येथील एआय सेंटरच्या उद्घाटनानंतर उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांची पत्नी डॉ. प्रीती अदानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पोहोचले. गोविंदबागेत अदानी दाम्पत्यासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील गोविंदबागेत उपस्थित होते.
पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन -
बारामती येथील एआय सेंटरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास शैलीत भाषणाची सुरुवात केली, ज्याने बारामतीकरांना हसवून टाकले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीच्या दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांचा उल्लेख खास शैलीत केला. पवार यांच्या या खास शैलीतील भाषणामुळे बारामतीकरांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन घडले.