‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:33 IST2025-02-18T12:31:48+5:302025-02-18T12:33:18+5:30
शहराची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कितीतरी जास्त आहे हे लक्षात घेत महापालिकेने २१ टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती

‘पुण्याच्या पाण्यासाठी पाटलांनी जलसंपदा मंत्र्यांना समज द्यावी', काँग्रेसची मागणी
पुणे: शहराची वाढीव लोकसंख्या विचारात घेता जलसंपदा विभागाने २१ टीएमसी पाण्याची पुण्याची मागणी त्वरित मंजूर करायला हवी; परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्याला नकार दिला आहे. आता उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण पुण्यातून निवडून आलो हे लक्षात घेत मंत्री विखे यांना किमान समज द्यावी व पाण्याचा कोटा मंजूर करून घ्यावा, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
शहराची लोकसंख्या ५० लाखांपेक्षा कितीतरी जास्त आहे हे लक्षात घेत महापालिकेने २१ टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. ती तर विखे यांनी नाकारलीच, शिवाय जास्त पाणी वापरासाठी महापालिकेला दंड ठोकू, अशी धमकीही दिली. पुण्याच्या वाढलेल्या लोकसंख्येची विखे यांना माहिती नसेल तर ती पाटील यांनी करून द्यावी. पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार असतानाही पुण्याच्या पाण्याचा कोटा नामंजूर व्हावा याचे आश्चर्य वाटते. तसेच भाजपचे मंत्री असलेले विखे व पाटील यांच्यासमोर पवार यांचे काहीही चालत नाही, असे पुणेकरांनी समजावे का, असा प्रश्नही जोशी यांनी केला.
पाण्याचा कोटा वाढवून मागताना महापालिकेने पाण्याच्या फेरवापराची प्रक्रिया पूर्ण करायला हवी, असा सल्ला जलसंपदा मंत्र्यांनी दिलेला आहे. त्यासाठी प्रकल्प लागतो, तो खर्चिक आहे, सरकारने त्यासाठी मदत करायला हवी. ती न करता फुकटचा सल्ला विखे यांनी महापालिकेला कशा करता द्यावा? पुणेकरांकडून भरभरून मते घेतलेल्या भाजपने पुणेकरांना पाण्यासाठी वाऱ्यावर सोडले असाच याचा अर्थ होतो, अशी टीकाही जोशी यांनी केली.