पासपोर्ट प्रक्रियेला आता जलद गती: बाणेरमध्ये नवे केंद्र, प्रतीक्षा कालावधी संपणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:17 IST2026-03-31T09:16:43+5:302026-03-31T09:17:08+5:30
नागरिकांनी आपल्या अपॉइंटमेंटनुसार थेट पाषाण येथेच उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

पासपोर्ट प्रक्रियेला आता जलद गती: बाणेरमध्ये नवे केंद्र, प्रतीक्षा कालावधी संपणार!
पुणे : परिसरातील नागरिकांसाठी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. वाढत्या अर्जांची संख्या आणि नागरिकांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन प्रशासनाने मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र बाणेर-पाषाण लिंक येथे आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंढवा येथील जुन्या केंद्रात दररोज केवळ ६०० ते ८०० अर्जांचा निपटारा केला जात असे. मात्र, नव्या बाणेर केंद्रात ही क्षमता वाढवून आता १८०० अर्ज प्रतिदिन केली आहे. त्यामुळे अपॉइंटमेंटसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणेकरांसाठी पासपोर्ट सेवेत मोठा बदल झाला असून, मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र आता बाणेर-पाषाण लिंक रोडवरील मोंटक्लेयर इमारतीमध्ये नवीन पासपोर्ट सेवा केंद्र अधिकृतपणे नव्या, अधिक आधुनिक स्वरूपातील सोमवार (दि. ३०) पासून सेवा सुरू झाली असून, नागरिकांनी आपल्या अपॉइंटमेंटनुसार थेट पाषाण येथेच उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
ते म्हणाले, पुण्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत आहे. ग्लोबल कपॅसिटी सेंटर आणि काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पारपत्राची सुविधा जलद आणि सोयीसुविधांनीयुक्त असणे गरजेचे आहे. पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे मुंढव्यातील पारपत्र सेवा केंद्राची जागा अपुरी पडत होती. हिंजवडी आणि परिसरातील आयटी कंपन्यांच्या दृष्टीने अंतराचाही प्रश्न होता. त्यामुळे या केंद्राचे स्थलांतर करण्यात आले. आता नव्या पारपत्र सेवा केंद्रात सुसज्ज जागा आणि अधिक सोयी-सुविधा आहेत.
पडताळणी केल्यानंतर निकषांनुसार प्रत्येकाला पारपत्र द्यायचे असते. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. काही प्रमाणात अर्जांची छाननी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या एका महिन्यात ४० हजारांहून अधिक सुमारे ९० टक्के अर्जदारांना पारपत्र देण्यात आले, तर कागदपत्रांच्या अभावामुळे आणि पडताळणीत आढळलेल्या त्रुटींमुळे काही अर्ज नाकारण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ई-पासपोर्ट सेवा अधिक बळकट करण्यात आली आहे. या पासपोर्टमध्ये एम्बेडेड आरएफआयडी चिपद्वारे अर्जदारांची वैयक्तिक व बायोमेट्रिक माहिती एन्क्रिप्ट स्वरूपात साठवली जाते. त्यामुळे इमिग्रेशन प्रक्रिया अधिक जलद आणि सुरक्षित बनते, तसेच बनावट पासपोर्टवर आळा बसण्यास मदत होते.