लोहगड किल्ल्याच्या भाजे गावाकडील काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 19:18 IST2025-06-07T19:17:44+5:302025-06-07T19:18:33+5:30
राज्यभरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली.

लोहगड किल्ल्याच्या भाजे गावाकडील काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही
पवनानगर (ता. मावळ) –पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावाच्या दिशेने काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी (दि. ७ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याचा मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाशी संपर्क साधला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
लोहगड किल्ल्याच्या पूर्व दिशेला लोहगड गाव वसलेले असून, किल्ल्यालगतच गावातील वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या ६५० हून अधिक आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे भाजे गाव स्थित आहे. राज्यभरात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळण्याची घटना घडली.
दरड कोसळल्यानंतर परिस्थितीची पाहणी करून महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाने घटनेची नोंद घेतली आहे. दरड लहान प्रमाणात कोसळल्यामुळे कुठलीही हानी झालेली नाही. मात्र, हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांनीही ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणा सतर्क असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
या घटनेविषयी माहिती देताना मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले, "लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला काही भाग कोसळल्याची माहिती मिळाली असून, याबाबत आवश्यक ती चौकशी सुरू आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे."