सीईटी सेलच्या ढिसाळपणामुळे पालक-विद्यार्थी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:36 AM2019-06-22T11:36:21+5:302019-06-22T11:48:39+5:30

सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे...

Parents and students are angry due to the CET cell's dullness | सीईटी सेलच्या ढिसाळपणामुळे पालक-विद्यार्थी संतप्त

सीईटी सेलच्या ढिसाळपणामुळे पालक-विद्यार्थी संतप्त

Next
ठळक मुद्दे सीईटी सेलच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी, विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीतीऑनलाईन अर्ज नोंदणीच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना अडचणींचा करावा लागला सामना

पुणे : तासन्-तास संगणकासमोर बसून आधी नोंदणी केली, त्यानंतर दोन-तीन दिवस सलग सेतु सुविधा केंद्रावर हेलपाटे मारले. आणि आता ही संपुर्ण प्रक्रियाच रद्द केल्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेउ इच्छिणारे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सीईटी सेलच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करताना विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीतीही व्यक्त केली. 
सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर व हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत दि. १७ जूनपासून ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोडिंग आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी दि. २१ जून रोजी अंतिम मुदत होती. पण सर्व्हर हँग होत असल्याने दि. २२ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण तांत्रिक बिघाड दुर होण्यात अडथळे येत असल्याने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय सेलला घ्यावा लागला. आता सोमवार (दि. २४) पासून ही प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करणार असल्याचे सेलने स्पष्ट केले आहे. सेलच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अर्जामध्ये दोन-तीन वेळा माहिती भरावी लागत होती. कागदपत्रे अपलोड करतानाही अडचणी होत होत्या. ही प्रक्रिया केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी सेतु केंद्रांवर जावे लागत होते. तिथे विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होती. पहिल्या दिवसापासून पडताळणीत अडचणी येत असल्याने या केंद्रांवर दिवसागणिक गर्दी वाढली. पण या केंद्रांवर पुरेशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
---------------
केंद्रीय पध्दतीने प्रवेश प्रक्रिया ही चांगली पध्दत असली तरी त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने होत नाही. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून अडचणी आल्या. कागदपत्रे पडताळणीसाठी दोनदा पुर्वनियोजित वेळ घेतली. पण दिवसभर थांबूनही काम झाले नाही. आम्ही सर्वचजण हतबल होतो. आता पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार असल्याने वेळ खुप जाणार आहे. त्यात पुन्हा काही अडचणी येणार नाहीत, अशी आशा आहे. 
- मेघ मित्तल, विद्यार्थी
.........
प्रवेश प्रक्रिया लांबण्याची भीतीपहिल्या दिवसापासूनच खुप मनस्ताप सहन करावा लागला. मी वडिलांसह सलग दोन-तीन दिवस सेतु केंद्रावर जात होते. पण सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काहीच काम झाले नाही. आता ही प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. माझे काही मित्र-मैत्रिणी १० ते १५ किलोमीटर अंतरावरील सेतु केंद्रावर जात होते. त्यांचा येण्याजाण्याचा खर्च आणि वेळही वाया गेला. 
- शिवानी खिलारी
विद्यार्थिनी 
--------------
कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सलग दोन दिवस पुण्यातून वाघोली येथील सेतू केंद्रावर जावे लागले. पण निराश होऊन परतावे लागले. वेळ आणि पैसाही वाया गेला. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रवेशाची धाकधुक असते. या प्रक्रियेने त्यात आणखी भर टाकली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खुप अडचणींचा सामना करावा लागतो. सीईटी सेलच्या नोटीफिकेशनची विद्यार्थी सतत वाट बघत असतात. या प्रक्रियेने त्यांची खुप ससेहोलपट होत आहे. 
- ललित पवार 

................
पालककाही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेतु सुविधा केंद्र देण्यात आली आहेत. या प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांप्रमाणेच या केंद्रातील कर्मचारीही हैराण झाले आहेत. विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने विचारणा झाल्याने त्यांच्यावरही ताण पडला होता. आता पुन्हा नव्याने ही प्रक्रिया होणार असल्याने पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे एका केंद्रातील प्राध्यापकांनी सांगितले.

Web Title: Parents and students are angry due to the CET cell's dullness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.