यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:56 IST2025-08-07T17:56:23+5:302025-08-07T17:56:35+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी ते नववीच्या परीक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य ...

यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता तिसरी ते नववीच्या परीक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी ने घेता प्रसारित केली गेली. त्यामुळे पेपर फोडल्याप्रकरणी आता एका यू ट्यूब चॅनेलवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्यूशन क्लासेस या तीन खासगी यू ट्यूब चॅनेल्सची नावे समोर आली आहेत. याप्रकरणी सहायक संचालक संगीता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आला. त्यानुसार खासगी यू ट्यूब चॅनेलवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमाच्या विविध कलमान्वये तसेच माहिती तंत्रज्ञान, भारतीय न्याय संहितेच्या ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार संगीता शिंदे ह्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होऊन प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. त्यानंतर २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी परिषदेतर्फे पायाभूत चाचणी ६ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक, मुंबई या सर्वांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. दि. १७ ते ३१ जुलैपर्यंत परिषदेकडून परीक्षेसाठी लागणारे पेपर खासगी कार्गो कंपनीमार्फत पाठविण्यात आले होते.
त्यानंतर ६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता एका यू ट्यूब चॅनेलवर संबंधित जिल्ह्यांना पाठवलेल्या चाचणी पत्रिका त्यापैकी सातवीचा मराठीचा पेपर, ५ ऑगस्टला झालेला व ७ ऑगस्टला होणारे सातवी, आठवीचे गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या यू ट्यूब चॅनेलची माहिती घेतल्यानंतर कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्यूशन क्लासेस या तीन यू ट्यूब चॅनेलची नावे पुढे आली. या खासगी यू ट्यूब चॅनेल्सनी कोणतीही परवानगी न घेता अज्ञाताकडून हे पेपर मिळवून या चॅनेलवर प्रश्न व त्यांची उत्तरे प्रसारित करून शासकीय आदेशाचा भंग केला. त्यानुसार या चॅनेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण घोडके करत आहेत.