विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:14 IST2025-06-13T17:07:05+5:302025-06-13T17:14:02+5:30

- अपघातामुळे प्रवासी संख्या घटणार

Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase | विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द

विमान प्रवाशांमध्ये धाकधूक; तिकीट काढूनही प्रवास केला रद्द

- अंबादास गवंडी

पुणे :
मी जूनअखेरला कामानिमित्त लंडनला जाणार होतो. तिकीटदेखील काढले होते. परंतु गुरुवारी (दि. १२) अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातामुळे मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील प्रवास रद्द केला आहे. अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येते. त्यामुळे पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे पुढील महिने विमान प्रवासी घटतील, असा दुजोरा हवाई तज्ज्ञांनीदेखील दिला आहे.

अहमदाबाद - लंडनला जाणारे बोइंग विमान कोसळून गुरुवारी २४१ विमान प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे भारतीय हवाई क्षेत्राच्या असलेल्या विश्वासार्हतेला हादरा बसला आहे. देशात ७०० ते ८०० विमाने असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. परंतु बाेइंग विमानाच्या अपघातामुळे भीतीपोटी अनेक प्रवासी पर्यायी साधनांचा वापर करण्याची तयारी केली असून, एकत्र कुटुंबाने जाणारे असतील तर ते टाळून वेगवेगळ्या विमानातून प्रवास करण्याचे नियोजन करत असल्याचे बोलत आहेत. तसेच विमान अपघातामुळे विविध घटकांवर परिणाम होणार असून, याचे आकर्षण असणारे तरुण-तरुणी दुसरा पर्याय निवडतील, शिवाय हवाई प्रवासासाठी असलेल्या विमा कंपन्यांकडून विम्याचे दर वाढविण्यात येतील, असा दावा हवाई अभ्यासक करत आहेत.

अभ्यासक म्हणतात...

-देशांतर्गत प्रवासासाठी नागरिक वंदे भारत, शताब्दी, राजधानी अशा रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतील.

-पुढील किमान पाच ते सहा महिने विमान प्रवाशांची संख्या लाखोने घटणार असून, याचा परिणाम विमान सेवेवर होणार आहे.

-हवाई क्षेत्रात पायलट, एअर होस्टेस या क्षेत्रात येणारे तरुण-तरुणी पर्यायी आणि सुरक्षित क्षेत्र निवडतील.

-विमा कंपन्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट होईल.

-कामानिमित्त वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल.

-विशेषत: ज्येष्ठांची संख्या घटणार असून, ते प्रवास करण्याचे टाळतील. 

माझे अनेक नातेवाईक, मित्र परिवार परदेशात स्थायिक आहेत. कधी कामामुळे किंवा कधी भेटण्याच्या निमित्ताने अधूनमधून परदेशात जाणे होते. दिवाळीच्या आसपास सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत जायचा प्लॅन पण केला होता, परंतु कालच्या अपघातामुळे तो कॅन्सल केला आहे. विमान अपघाताच्या घटनेमुळे मन अतिशय व्यथित झाले असून, सध्याच्या परिस्थितीत तरी कोठे जायचा विचार नाही. जे प्रवासी मृत पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - आनंद सप्तर्षी, प्रवासी
 

माझ्या विविध कामांमुळे महिन्यातून एक-दोनदा परदेशात जाणे होते. परंतु काल जी घटना घडली, ती मनाला हादरवून सोडणारी आहे. फोटो पाहिले की अंगावर काटे येतात. कालपासून पाहुण्यांकडून माझी चाैकशी केली जाते. परंतु जीवन म्हणजे कटपुतळी बाहुली आहे. या अपघातामुळे मनावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने विमान प्रवास करायचे टाळणार आहे.  - उषा सूर्यवंशी, व्यावसायिक 

गुरुवारी जी घटना घडली आहे, ती भयानक आणि मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी आहे. विमान प्रवास सुरक्षित आणि सुपर आहे. परंतु अशा घटनेमुळे मनाचे खच्चीकरण होते. विमान प्रवास करताना हजार वेळा विचार मनात येतात. परंतु नियोजन केलेला प्रवास आता रद्द केला आहे.  - ॲड. अभिषेक उपाध्ये, प्रवासी

 

Web Title: Panic among airline passengers; Trips cancelled despite ticket purchase