पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:37 IST2019-07-05T19:34:48+5:302019-07-05T19:37:42+5:30
दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली..

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या पालखी सोहळा नियोजनासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना
फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली .
फलटण येथील पालखी तळावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठकीत समिती स्थापन करण्यात आली.
या कमिटीमध्ये सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर , श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा एक प्रतिनीधी, दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे, राणू महाराज वासकर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य माऊली जळगावकर यांचा समावेश करण्यात आला आहे .
पालखी सोहळ्यात कोणाला कोणते मान आहेत हे सांगावेत, सोहळ्यात सर्वच मालक होतात, वाहनाचे व दर्शनाचे पास देतानाही गैरव्यवहार होतो, भागवत संप्रदाय वाढत चालला आहे, तळावर जागा अपुऱ्या पडत चालल्या आहेत. तळ वाढविणे गरजेचे आहे, वारकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी सासवड , लोणंद व भंडीशेगाव येथे बैठक व्हावी, रथावर प्रमाणापेक्षा अधिक लोक बसतात ते मर्यादित करावेत, माऊलींच्या पालखी सोहळ्यात इतर पालखी सोहळे चालतात, त्यांना बंदी घालण्यात यावी, सोहळ्याचे नियंत्रण करण्यासाठी वारकरी पोलिसांचे ऐकत नाहीत, त्यासाठी प्रत्येक दिंडीतुन दोन स्वयंसेवक द्यावेत. अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
या बैठकीस मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळा प्रमुख योगेश देसाई , विश्वस्थ डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. अभय टिळक, नामदेव महाराज वासकर, व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते .
..............
पत्रकाराला धक्काबुक्की
दिंडी समाजाच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकमतच्या अमोल अवचिते पत्रकाराला यावेळी धक्काबुक्की करण्यात आली व त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. सदर वृत्त कळताच पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिंडी समाजाच्या बैठकीत जावून जाब विचारला. त्यावेळी सदर घटना अनवधनाने झाली. याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो असे प्रमुख विश्वस्थ ॲड. विकास ढगे पाटील, माऊली जळगावकर, राणू वासकर, अध्यक्ष मारुती कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला .