ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; कार विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:56 IST2023-02-07T14:56:18+5:302023-02-07T14:56:53+5:30
नियंत्रण सुटल्यावर गाडी कठडा नसलेल्या विहिरीत पडली

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं; कार विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
टाकळी हाजी : अण्णापूर-शिरूर रस्त्यावर कार विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर-अण्णापूर रस्त्यावरील अण्णापूर येथे राहुल गोपीनाथ पठाडे (रा. आसेगाव रस्ता, शेवगाव, जि. नगर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राहुल गोपीनाथ पठाडे हा पांढऱ्या रंगाची गाडी चालवत होता. दरम्यान, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून गाडीसह बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमाने यांनी धाव घेत परिसरातील नागरिकांच्या मदतीने गाडीसह त्याला बाहेर काढले. परंतु, उशिरा मदत मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानुसार, हा युवक शिरुरकडून मलठणकडे आपल्या गाडीसह जात असताना तो पुन्हा येवले माथा येथून मागे वळून पुन्हा शिरुरकडे जात होता. यादरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी रस्ता सोडून पंधरा फूट लांब असणाऱ्या व कठडा नसलेल्या विहिरीत पडली.