जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:53 IST2025-10-27T18:51:48+5:302025-10-27T18:53:39+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत, याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे

जोपर्यंत कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार - जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज
पुणे : जैन बोर्डिगच्या जागेचा व्यवहार गोखले बिल्डर यांनी व्यवहार रद्द करण्याबाबत ट्रस्टींना मेल केला आहे. त्यांचे स्वागत आहे. या व्यवहारातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. ट्रस्टी भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे परंतु जोपर्यंत यामध्ये कायदेशीररित्या संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरूच राहणार आहे. त्यामुळे मोर्चा निघेल, हा मोर्चा ट्रस्टीच्या विरोधात निघेल, असे जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले.
जैन बोर्डिंगचा जमिन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे. विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे असे सांगुन जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे. १७ ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणं पाठवलं होतं. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाहीये. या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी शब्द देखील काढलेला नाही. ते जैन समाजासोबत पक्षपात आणि अन्याय करत आहेत. त्यांनी येऊन समाजासोबत उभं राहणं आवश्यक आहे, अशी अपेक्षा जैन आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी व्यक्त केली.
जैन बोर्डिंगचे २३० कोटी धर्मादाय आयुक्तांनी गोठवले
जैन बोर्डिंगचे ट्रस्टी यांच्यासोबत विशाल गोखले यांनी जमिनीचा व्यवहार रद्द केला आहे. याबाबतचा ई-मेल त्यांनी जैन बोर्डिंग च्या ट्रस्टींना पाठवला आहे. धर्मादाय आयुक्तालय यांना ईमेल पाठवण्यात आला आहे. पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे ई -मेलमध्ये नमूद केले आहे.काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहार जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देण्यात आले होते.हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे. पण धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंगचे २३० कोटी रुपये गोठवले आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी ट्रस्टींना २३० कोटी रुपये काढता येणार नाही, असा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे.