व्यवस्थेशी झगडूनही आमचा भ्रमनिरास; राज्यात ७२ तृतीयपंथींच्या भरतीचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 02:03 PM2023-06-18T14:03:22+5:302023-06-18T14:04:38+5:30

आम्हाला व्यवस्थेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच नसल्याने क्षमता असूनही भिक मागावी लागते

Our disillusionment despite fighting the system The dream of recruitment of 72 third parties in the state was shattered | व्यवस्थेशी झगडूनही आमचा भ्रमनिरास; राज्यात ७२ तृतीयपंथींच्या भरतीचे स्वप्न भंगले

व्यवस्थेशी झगडूनही आमचा भ्रमनिरास; राज्यात ७२ तृतीयपंथींच्या भरतीचे स्वप्न भंगले

googlenewsNext

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्यानंतर मला सन्मानाने जगता येईल, असे स्वप्न मी पाहत हाेते; परंतु, अंतिम निवड यादी पाहिली आणि माझा भ्रमनिरास झाला. कारण तृतीयपंथी (पारलिंगी) असूनही माझी गणती पुरुष गटात करण्यात आल्याने मी बाहेर पडले. जर तृतीयपंथींसाठी अंतिम निवडीची स्वतंत्र यादी पाेलिस खात्याने लावली असती तर, कदाचित आज मीदेखील सन्मानाने वर्दीत असते. पात्र असूनही शासनाचे धाेरणच नसल्याने माझी निवड होऊ शकली नाही,’ अशी व्यथा पुण्यातील तृतीयपंथी विजया वसावे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

याच गटातील झोया शिरोळे, आर्य पुजारी आणि निकिता मुख्यदल यांचीही कहाणी काही वेगळी नाही. या सर्व जणींनी व्यवस्थेशी झगडून, न्यायालयात दाद मागत पाेलिस भरतीमध्ये अर्ज करण्याची परवानगी मिळवली. यानंतर मैदानी चाचणी व लेखी परीक्षेत चांगले गुण मिळविले; परंतु, तृतीयपंथींच्या भरतीबाबत ना पाेलिस दलाकडे कुठली जागा आहे, ना आरक्षण आहे ना कुठले निकष. शासनाच्या या धोरण लकव्याचा फटका या पात्र उमेदवारांना बसला आहे. शहरातील या चाैघींसह राज्यातील ७२ जणींचे पाेलिस हाेण्याचे स्वप्न भंग झाले आहे. यामुळे हे उमेदवार नैराश्याच्या गर्तेत अडकले आहेत.

पाेलिस भरतीत महिला आणि पुरुषच अर्ज करू शकतात; परंतु, तृतीयपंथींनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने त्यांनाही फाॅर्म भरण्यास मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथींना पाेलिस भरतीमध्ये १३ डिसेंबरपासून अर्ज करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये राज्यभरातून ७२ तृतीयपंथींनी अर्ज भरले.

ट्रान्सफिमेल व ट्रान्समेल म्हणजे काय?

जर एखाद्या पुरुषामध्ये स्त्रीप्रमाणे भावना असतील तर त्यांना तृतीयपंथी महिला (ट्रान्सफिमेल) म्हणतात. तसेच जर एखादी महिला असेल व तिच्या भावना पुरुषांप्रमाणे असतील तर तिला तृतीयपंथी पुरुष (ट्रान्समेल) असे म्हणतात.

फॉर्म भरला; पण मैदानी चाचणीचे निकषच नव्हते...

फाॅर्म तर भरला; परंतु, मैदानी चाचणीचे निकषच तयार नव्हते. यामुळे तयारी कशी करायची, हा प्रश्नच होता. मग दीड महिन्याआधी त्यांना निकष सांगण्यात आले. यामध्ये तृतीयपंथी महिलांसाठी महिलांचे निकष तर तृतीयपंथी पुरुषांसाठी पुरुषांचे निकष लावण्यात आले. तरीही मिळालेल्या कमी वेळेत सराव करून त्यांनी चांगली तयारी केली.

मैदानी चाचणीचे प्रवेशपत्रही नाही

फॉर्म भरलेल्या प्रत्येकाला प्रवेशपत्र दिले जाते. परंतु तृतीयपंथींना प्रवेश पत्र मिळालेच नाही. त्यांना फोन करून ‘मैदानी चाचणी आहे तुम्ही या’ असे सांगण्यात आले. ज्यांचा फोन लागला नाही त्यांना कळवलेही नाही. मात्र, त्यांनीच एकमेकांना फोन केला आणि मैदानी परीक्षेला हजर झाले. ७२ पैकी काहींना लेखी परीक्षाही नाकारली गेली तर काहींनी झगडून ती दिली.

अंतिम यादीत मात्र, नावच नाही

अर्ज करण्यापासून मैदानी व लेखीपरीक्षा देण्यापर्यंत इतका संघर्ष केला. मार्कही चांगले मिळाले. आता अंतिम निवड यादीत नाव येईलच असे वाटत हाेते. जिल्हानिहाय पोलिस भरतीची मेरिट लिस्ट दि. २६ मे रोजी लावली गेली. मात्र या ७२ पैकी एकीचेही नाव त्यात नव्हते. त्यांच्यासाठी स्वतंत्र यादी लावून निवड करणे गरजेचे असताना ट्रान्समेलला पुरुषांच्या यादीत व ट्रान्सवुमेनला महिलांच्या यादीत टाकण्यात आले होते.

नियमांमध्ये अस्पष्टता

काही यादीत तृतीयपंथी महिला तर काही यादीत फक्त स्त्री म्हणून नोंद केली. यामध्ये विजया वसावे व झोया शिरोळे यांची नोंद तृतीयपंथी महिला, अशी केली आहे. तर निकिता मुख्यदल यांची नोंद महिला अशी करण्यात आली आहे. त्यामुळे तृतीयपंथी यांचा निकाल नेमक्या कोणत्या गटात लागेल, हा प्रश्नच होता.

तृतीयपंथींना स्थान का नाही? 

छत्तीसगडमध्ये तृतीयपंथीयांना कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसताना १४ तृतीयपंथी पोलिस विभागात काम करतात. तसेच कर्नाटक, राजस्थान या राज्यातही तृतीयपंथींना पोलिस विभागात संधी दिली आहे. महाराष्ट्राची पूर्वीपासून पुरोगामी राज्य म्हणून ओळख असताना राज्याच्या पोलिस विभागात मात्र तृतीयपंथींना स्थान का नाही?  - विजया वसावे, पाेलिस भरतीची उमेदवार

क्षमता असूनही भिक मागावी लागते

अनाथांना आरक्षण आहे. त्यांना त्यावर नाेकरीही मिळते. मात्र, आम्हाला व्यवस्थेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच नसल्याने क्षमता असूनही भिक मागावी लागते.  - झाेया शिराेळे, पाेलिस भरतीच्या उमेदवार

 पुढील याेग्य ती पावले उचलण्यात येतील

आपण पाेलिस भरती ही शासकीय नियमाप्रमाणे करत असताे. परंतु, तृतीयपंथीयांबाबत मला फारशी माहिती नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन पुढील याेग्य ती पावले उचलण्यात येतील. - संदीप कर्णिक, सहपाेलिस आयुक्त, पुणे

Web Title: Our disillusionment despite fighting the system The dream of recruitment of 72 third parties in the state was shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.