१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 03:19 PM2024-05-12T15:19:26+5:302024-05-12T15:23:00+5:30

राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. मात्र या निवडणुकीत १९९९ च्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा चर्चेत आला. १९९९ साली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रि‍पदाची स्वप्ने पडू लागली, त्यातून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. जनहितापेक्षा पद महत्त्वाचे असं उद्धव ठाकरेंचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

१९९५ च्या धार्मिक लाटेत महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार आलं, बहुसंख्य हिंदू मते या दोन्ही पक्षाला मिळाली. मात्र १९९९ पर्यंत ही मते पुन्हा जातीजातीत विखुरली. त्यामुळे १९९५ मध्ये जी परिस्थिती होती तशी १९९९ मध्ये पुन्हा राहिली नाही. १९९९ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये दुसरं बंड केले. पवार हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. १९९९ मध्ये केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकार पाडण्यात पवारांची भूमिकाही चर्चेत होती. मात्र सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यांवरून काँग्रेसमध्ये पवारांनी फूट पाडली.

१५ मे १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेस कार्यकारिणीत पी ए संगमा, तारीक अन्वर यांच्या साथीने भारतात जन्माला आलेल्या व्यक्तीनेच पंतप्रधानपदी विराजमान व्हावे अशी भूमिका घेतली. पवारांच्या या भूमिकेला पक्षात विरोध झाला. त्यानंतर काँग्रेसनं पवारांसह तिघांचेही निलंबन केले. १९९५ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला होता. १९९५-९९ या काळात दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखानदारी धोक्यात आली. साखर कारखान्यांची चौकशी आणि त्यांच्या हितसंबंधांना धोका पोहचला होता. त्यातच १० जून १९९९ साली शरद पवारांनी सोनिया गांधींना विरोध करत राष्ट्रवादीची स्थापना केली.

१९९० च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलन, मुंबई दंगली, बॉम्बस्फोट,बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, त्यांचे दौरे, काँग्रेस सरकारवर झालेले भ्रष्टाचार यामुळे राज्यात १९९५ साली शिवसेना भाजपा सरकार आलं. हे महाराष्ट्रातलं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होते.

खरेतर राज्यात २००० साली सरकारची ५ वर्ष पूर्ण होणार होती. परंतु मार्च १९९९ साली १३ महिन्याचं अटलबिहारी वाजपेयी सरकार एका मतानं पडले. काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे दुसरं सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे देशात लोकसभा निवडणुका लागल्या होत्या.

त्यावेळी प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरेंना राज्यातील विधानसभा ६ महिने आधी बरखास्त करून निवडणुकांना सामोरे जावू असं पटवून दिले, त्यात अटलबिहारी वाजपेयींची लोकप्रियता, १३ दिवसांचे आणि १३ महिन्यांचे सरकार पडल्यामुळे लोकांमध्ये सहानुभूती याचा फायदा महाराष्ट्रात युतीने करून घेण्याचा प्रयत्न होता.

त्यात राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडली होती. शरद पवारांनीही वेगळी चूल मांडत राष्ट्रवादीची स्थापना केली होती. त्यामुळे बाळासाहेबांनीही तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून मार्च २००० ऐवजी सप्टेंबर १९९९ मध्येच निवडणुकांना सामोरे जाण्याची सूचना केली.

१९९९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्र लढल्या तर काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी लढली. त्यावेळी लोकसभेत मतदारांनी वाजपेयींच्या पारड्यात मतदान केले. तर विधानसभेला युतीला फारसं यश आलं नाही. ६ ऑक्टोबरच्या निकालात शिवसेनेचे ६९, भाजपाचे ५६ आमदार असे १२५ आमदारांपर्यंत मजल मारली.

तर दुसरीकडे काँग्रेसनं ७५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिल्याच निवडणुकीत ५८ आमदार निवडून आणले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात काँग्रेसशी फारकत घेतलेल्या शरद पवारांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता आणली.

युती सरकारच्या पराभवामागे अनेक कारणे चर्चेत होती. त्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी चढाओढ लागली. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपानं बहुमत मिळवण्याच्या रस्सीखेंच स्पर्धेत अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्यात अपयशी ठरले. त्यात वेळेतच शरद पवारांनी काँग्रेससोबत सरकार स्थापनही केले.