इतर कंपन्यांचे उत्पादन ‘एचए’मध्ये

By Admin | Updated: June 26, 2015 04:21 IST2015-06-26T04:21:19+5:302015-06-26T04:21:19+5:30

भारत सरकारच्या उत्तर भारतातील ऋषीकेश आणि कर्नाटक येथील औषध कंपन्यांतील अतिरिक्त उत्पादन येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स कंपनीत (एचए) करण्यात येणार आहे

In other companies' production of 'Ha' | इतर कंपन्यांचे उत्पादन ‘एचए’मध्ये

इतर कंपन्यांचे उत्पादन ‘एचए’मध्ये

पिंपरी : भारत सरकारच्या उत्तर भारतातील ऋषीकेश आणि कर्नाटक येथील औषध कंपन्यांतील अतिरिक्त उत्पादन येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स कंपनीत (एचए) करण्यात येणार आहे. त्यामुळे कंपनीत उत्पादन सुरू करण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने बुधवारी झालेल्या बैठकीत दिली. मात्र, हा तात्पुरता दिलासा असून, पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याची मागणी कामगार प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे.
कंपनी पुनर्वसनासाठी काय धोरण आहे, त्या संदर्भात काय पाठपुरावा केला आहे, या संदर्भात ठोस भूमिका समजून घेण्यासाठी एचए मजदूर संघ आणि व्यवस्थापनाची सकाळी बैठक झाली. या वेळी कंपनीचे अधिकारी के. व्ही. वर्की, अनिल वैद्य, व्यवस्थापक टी. दास, संघाचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे, सचिव सुनील पाटसकर, खजिनदार राजेंद्र धेंडे, प्रदीप देवकर, महेश बधे, संजय भोसले, राजा जाधव, रमेश वाघ आदी उपस्थित होते.
सरकारच्या ऋषिकेश येथे आयडीपीएल आणि कर्नाटक येथे केपीएल या औषध कंपन्या आहेत. तेथे क्षमतेपेक्षा अधिक आॅर्डर आहे. त्यामुळे तेथील उत्पादन एचएमध्ये केले जाणार आहे. त्या कंपन्या कच्चा माल आणि साहित्य पुरविणार आहेत. आवश्यक यंत्रसामग्री बसवून देणार आहेत. त्यामुळे येथील उत्पादन सुरू केले जाणार आहे. या संदर्भात त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कंपनीस भेट देऊन पाहणी केली. या पद्धतीने उत्पादन सुरू करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधींना सांगितले.
मात्र, कंपनी पुनर्वसन निधीविषयी व्यवस्थापनाने काहीच सांगितले नाही. पूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्याबाबत व्यवस्थापनाकडे ठोस नियोजन नसल्याचे बैठकीत दिसून आले. सद्य:स्थितीत उत्पादन सुरू केल्यास कामगारांना काम मिळेल. त्यामुळे कंपनी चालविली जाईल. मात्र, कामगारांना वेतन मिळाले पाहिजे, यावर बैठकीत विचारविनियम झाला. यातून मार्ग काढण्याचा निर्णय कामगार प्रतिनिधींनी घेतला. कामगारांचे ९ महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे ते व त्याचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत. यातून तातडीने तोडगा काढण्याची मागणी कामगार प्रतिनिधींनी कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In other companies' production of 'Ha'