स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: May 19, 2024 14:48 IST2024-05-19T14:47:00+5:302024-05-19T14:48:16+5:30
अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या होत्या

स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक
पुणे : स्विगी या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीकडून शहरातील एका हॉटेलची ५६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्विगी मार्फत ग्राहकांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ हॉटेल अथवा कोणत्याही खाद्यपदार्थ बनवणाऱ्या आस्थापनेकडून घरपोच आणून दिले जाते. त्यामुळे हे अॅप लोकप्रिय आहे. परंतु स्विगी कंपनीने हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डरचे पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्विगी कंपनी व मॅनेजर संदीप शर्मा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २६ मार्च २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत बंडगार्डन येथील ब्लू नॉईल रेस्टॉरंट येथे घडला आहे.
याबाबत रेस्टॉरंटच्या वतीने विद्यागैरी भावकर (५५, रा. बंडगार्डन रोड, पुणा क्लब समोर) यांनी शनिवारी (दि. १८) बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून स्विगी कंपनीसह मॅनेजर संदीप शर्मा यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगी आणि भावकर यांच्या रेस्टॉरंटमध्ये व्यवहार झाला होता. अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार फिर्यादी यांच्या रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या. मात्र, ऑर्डर दिल्यानंतर त्याचे पैसे स्विगी कंपनीने रेस्टॉरंटला न देता ५५ लाख ९९ हजार ८८२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गर्कळ करत आहेत.