पुणे : ‘भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणण्याचा कानमंत्र जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. काँग्रेसची कितीही लोकं आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार आहे, तुम्ही घाबरू नका; पक्ष तुमच्या पाठीशी आहे,' असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, महेश लांडगे, राहुल कुल, उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी-चिंचवडमधील उद्धवसेना आणि आप पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही. काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही. शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही, उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत. त्यांना त्यांची पार्टी संभाळता येत नाही तर आम्ही काय करावं? उद्धवसेनेचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की, उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत. आता आम्ही काय करायला हवं?’ असाही सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
एक महिन्यामध्ये महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करणार
पुढच्या काळात पक्षाचं संघटन अधिक मजबूत करून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवा. एका महिन्यामध्ये महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त करणार आहे. आम्हाला आता कानमंत्र देण्याची गरज नाही. पुढची १५ वर्षे महाराष्ट्रात आमचे महायुतीचेच सरकार असणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.