या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:25 IST2025-05-08T11:20:56+5:302025-05-08T11:25:51+5:30
जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे
पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २५ लोकांनी जीव गमावला. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने ते नागरिक अजूनही धक्क्यातच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. संपूर्ण देशाकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले. मात्र अमित ठाकरे यांनी कारवाईबाबत समाधानी नसल्याचे सांगत त्या अतिरेक्यांना ठेचून मारायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे, संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होतंय. आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ, त्यांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पहलगाम घटनेनंतर जेवढं दुःख झालं होतं. तेवढा आनंद किंवा समाधान मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायेत. भारतात असतील किंवा पाकिस्तान ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतायेत. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ते दहा लोकं किंवा बारा लोकं जे आले होते ते मरतील .ज्यांनी आपल्या पंचवीस जणांची हत्या केली. ज्या अतिरेक्यांनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा. जसं राज साहेब बोलले की युद्ध हे उत्तर नाही. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याला जे सांगितलं जात ते ते करत असतात. काही लष्करचे अड्डे किंवा काही दहशतवादी अड्डे तिकडे उध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हा पहलगाम हल्ला कशामुळे झाला? ती लोकं अजून मोकळे फिरतायेत त्यामुळे तो आनंद मला अजून मिळाला नाही. कारण ते अजून मोकळे फिरणारे आत आले कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? नाही आपल्या भारतात घुसून मारलंय ना आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट आहे. पण ते पंचवीस लोकं शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला. ते आलेच कसे? त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. हे तर यंत्रणेचं अपयश आहे.