महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे

By Admin | Updated: June 23, 2015 03:24 IST2015-06-23T03:24:15+5:302015-06-23T03:24:15+5:30

महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा केलेला दावा पहिल्याच पावसात फोल ठरला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करूनसुद्धा खड्ड्यांची परिस्थिती जशीच्या

Open the brot of municipal administration | महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे

महापालिका प्रशासनाचे पितळ उघडे

पिंपरी : महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा केलेला दावा पहिल्याच पावसात फोल ठरला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करूनसुद्धा खड्ड्यांची परिस्थिती जशीच्या तशीच आहे. पहिल्याच पावसाने पालिका प्रशासनाचे पितळ उघड केले आहे. तसेच महावितरणचा कारभारही चव्हाट्यावर आला असून, अनेक ठिकाणी रात्रभर वीज गायब होती. सोमवारी सायंकाळपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. तसेच नालेसफाईची कामे न झाल्याने रस्त्यांवर पाणी आले. महापालिकेच्या वतीने पावसाळ्याआधी बुजविण्यात आलेले खड्डे पहिल्याच पावसात उघडे पडले आहेत. शहरात अनेक ठिकाणी केबल टाकण्याचे काम चालू होते. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. त्या जागा पालिकेच्या वतीने खडी व डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आल्या होत्या. मात्र, हे काम व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक चौकांत मोठे खड्डे पडले आहेत.
रविवारी शहरात पाऊस झाला. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेली कामे काय दर्जाची होती, हे लक्षात आले. संपूर्ण शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणचे चेंबर जाम झाल्यामुळे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली.
शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे कुठे खड्डा आहे, याचा अंदाज वाहनचालकांना न आल्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले. चापेकर चौक, पिंपरी कॅम्प, पिंपरी पुलाजवळ असलेले खड्डे, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर चौकातील खड्डे उघडे पडले आहेत. या खड्ड्यांतील खडी रस्त्यावर आल्यामुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडले आहेत.
लोकल उशिरा
खडकी : खडकी ते लोणावळा लोहमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने खडकी -लोणावळा वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. त्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पहाटे पाचच्या सुमारास पाऊस पडण्यास सुरु वात झाली व त्यानंतर तीन ते चार तास ही संततधार सुरू होती.
आळंदी-दिघी रस्त्यावर पाणी
दिघी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पहिल्याच पावसाने आळंदी-दिघी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साचलेले पाणी, रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे. रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे चिखलातून डांबरी रस्त्यावर धावणारे अनेक वाहनचालक पडून जखमी होत आहेत.
विद्युतपुरवठा खंडित
चिंचवड : सोमवारी पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सकाळी शालेय विद्यार्थ्यांबरोबरच चाकरमान्यांचे हाल झाले. पावसामुळे बहुतांश भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, इंदिरानगर, बिजलीनगर भागात अंधार होता. संततधारेमुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष झोडगे यांनी सांगितले.
मशागतीची कामे खोळंबली
मोशी : परिसरामध्ये शेतात पाणी साचल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)

Web Title: Open the brot of municipal administration