Only fifteen kilometers of roads are decoration In just three years, | तीन वर्षांत फक्त पंधरा किलोमीटरचे रस्ते सुशोभित
तीन वर्षांत फक्त पंधरा किलोमीटरचे रस्ते सुशोभित

ठळक मुद्देवाहतूक पोलीस, मेट्रोची कामे, तुटपुंजी आर्थिक तरतूदगेल्या तीन वर्षांत केवळ १५ किलोमीटर अंतराचेच रस्ते व पदपथ सुशोभित होऊ शकले

नीलेश राऊत

पुणे : रस्त्यावरून चालणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि प्रत्येक जण पादचारी असतोच असतो़. याप्रमाणे महापालिकेने तयार केलेल्या ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा’ धोरणानुसार २०१६पासून शहरातील शंभर किलोमीटर अंतराचे रस्ते व पदपथ सुशोभीकरणाचे नियोजन केले़. मात्र, गेल्या तीन वर्षांत केवळ १५ किलोमीटर अंतराचेच रस्ते व पदपथ सुशोभित होऊ शकले आहेत़. रस्त्यांवर प्रथम वाहनांना पुरेशी जागा असावी. ही वाहतूक पोलिसांची भूमिका, मेट्रो प्रकल्पाकरिता सुरू असलेली कामे व तुटपुंजी आर्थिक तरतूद यामुळे या पदपथ व रस्ते सुशोभीकरणाची कामे रेंगाळली गेली आहेत़.
शहरातील महत्त्वाचे रस्ते विकसित करताना सर्व घटकांचा विचार व्हावा, याकरिता तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१६मध्ये ‘पादचारी सुरक्षा आणि सुविधा’ धोरण आणले होते़. याद्वारे शहरातील शंभर किलोमीटर लांबीचे रस्ते निश्चित केले़. सदर रस्त्यांच्या विकसनाकरिता रस्त्यांची चार झोनमध्ये विभागणी केली़ याकरिता देशपातळीवरील चार अर्बन डिझायनर यांची स्थायी समितीमार्फत सन २०१७मध्ये नियुक्तीही केली होती़. परंतु, आजमितीला केवळ जंगली महाराज रस्ताच या धोरणानुसार नियोजनाप्रमाणे नटू शकला आहे़.
रस्त्याच्या विकसनात पदपथाला प्राधान्य देताना, पहिल्या टप्प्यात ३३ किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित करून प्रारंभी जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता व काँग्रेस भवन रस्ता निवडले गेले. परंतु, काँग्रेस भवन रस्त्या सुशोभीकरण मेट्रोच्या कामामुळे रखडले गेले, तर फर्ग्युसन कॉलेज रस्त्याचे काम मार्च २०२०अखेर पूर्ण होऊ शकेल, असा प्रशासनाला विश्वास आहे़. 
या धोरणानुसार, पुणे शहरातील शंभर किलोमीटर अंतराचे रस्ते निवडले. यामध्ये राजभवन रस्ता, संजय गांधी रस्ता (आगाखान पॅलेस रस्ता), जुना पुणे-मुंबई रस्ता, घोले रस्ता, संताजी घोरपडे रस्ता, चतु:शृंगी रस्ता, सेनापती बापट मार्ग, लॉ कॉजेज रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील केटकर रस्ता, सहस्रबुद्धे रस्ता, कॅनॉल रोड, कर्वे रस्ता, शिवाजीनगर स्टेशन रस्ता, आगरकर रस्ता, गोखले रस्ता, मॉडर्न कॉलेज रस्ता, शिवाजी रस्ता, पीएमसी रस्ता, जनवाडी रस्ता व बी़ जे़ मेडिकल कॉलेज रस्ता हे सुशोभित करण्याचे नियोजित केले़. 
परंतु, यांपैकी तीन रस्ते सोडता उर्वरित ठिकाणी आलेल्या अडचणींवर मात करण्यात पालिकेला यश आले नाही़. परिणामी, या ठिकाणी काही ठिकाणी ५० मीटर, २०० मीटर, अर्धा किलोमीटर व जास्तीत जास्त सलग दोन किलोमीटर रस्ता सुशोभित करता आला़. यामध्ये साधारणत: अडीच मीटर रुंदीचे फुटपाथ साकारताना रिकाम्या     जागेवर शिल्प उभारणी, पादचाºयांना बसण्यास बाक उभारणे, आकर्षक वृक्षरचना करणे, अंध-अपंग लोकांकरिता सुविधा, भित्तिचित्रे लावणे, कारंजे बसविणे, व्यायामाची साधने आदींची सोय करून देण्याचे नियोजन होऊ शकले़. 
या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता आर्थिक तरतूदही झाली़ त्यानुसार आजपर्यंत ३० कोटी रूपये या सुशोभीकरणावर खर्च झाले असून, पदपथाचे 
रुंदीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह साधारणत: एका किलोमीटरकरिता दोन कोटी रुपये खर्च आलेला आहे़. 
पालिका प्रशासनाकडून विविध माध्यमांतून या सुशोभीकरणाकरिता विरोधकांची मानसिकता करण्यात येत असली, तरी त्याला हवे तसे यश या कामाचा वेग पाहता आलेले दिसत नाही़. दरम्यान या वर्षीच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात याच धोरणाकरिता ७ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद केली असून, त्याद्वारे किती रस्ते सुशोभित होणार, हा खरा प्रश्न आहे़.
..........
अतिक्रमणाच्या विळख्यात शहरातील अनेक रस्ते व पदपथ अडकलेले असताना या सुशोभीकरणाकरिता पदपथ अतिक्रमणमुक्त व अनधिकृत बांधकामे हटवून उपलब्ध करून देणे, हे मोठे आव्हान अतिक्रमण विभागाकडे आहे़ 
.....
त्यातच अनेक ठिकाणी आधी वाहनांना पुरेसा रस्ता द्या; मगच पदपथासाठी हवी तेवढी जागा घ्या, अशी भूमिका सर्वांकडून घेतली जात असल्याने या धोरणाची अंमलबजावणी   संथ गतीने सुरू आहे़. अनावश्यक ठिकाणी पदपथ रूंद नकोत.
पुणे शहरात काही ठिकाणी पालिकेने पदपथ रूंद केले आहेत़. परंतु, जेथे पादचारी संख्या मोठी आहे अशा ठिकाणी पदपथ रूंद करणे रास्त आहे़. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी नित्याची बाब बनली आहे, तेथे पदपथांची रूंदी ही कमीच असावी़ अनावश्यक ठिकाणी पदपथ (फुटपाथ) मोठे करणे, हे वाहतूककोंडीला खतपाणी घालणारे ठरत आहेत़ - प्रकाश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक पोलीस विभाग.
..........
महापालिकेने शहारातील रस्त्यांकरिता जे पादचारी धोरण स्वीकारले होते, त्या धोरणाला गेल्या तीन वर्षांतील कामाचा वेग पाहता, गांभीर्याने घेतलेले दिसत नाही़. पादचारी धोरणाची अंमलबजावणी दोन रस्ते वगळता अन्यत्र कुठेही अपेक्षित झालेली नाही़. आजही शहरातील रस्त्यांवर लोकांना सुरक्षितता व चालणे सुलभ झाल्याची परिस्थिती नाही़ पादचारी धोरण पालिकेने तयार केले आहे; म्हणून काम न करता त्यास गांभिर्याने घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही करणे जरुरी आहे़ - प्रशांत इनामदार, निमंत्रक, पादचारी प्रथम.

Web Title: Only fifteen kilometers of roads are decoration In just three years,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.