अवकाळी पावसाने जुन्नर तालुक्यातील कांदा शेतकरी हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 18:21 IST2025-10-31T18:21:20+5:302025-10-31T18:21:33+5:30
- महाग बियाणे, मेहनत आणि आशा सर्वच पाण्यात; रोपे कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसाने जुन्नर तालुक्यातील कांदा शेतकरी हतबल
ओतूर : जुन्नर तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नुकतीच उगवलेली तसेच अंकुरण्याच्या प्रक्रियेत असलेली कांद्याची रोपे पावसाच्या पाण्याने मातीत दबली जाऊन कुजून गेल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि निराशेचे सावट पसरले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा पिकाची लागवड केली होती. तब्बल २,५०० रुपये किलो दराने महाग बियाणे खरेदी करून त्यांनी पेरणी केली. नुकतीच अंकुरलेली रोपे पाहून “यावर्षी भरघोस उत्पादन मिळेल” या आशेने शेतकरी आनंदी होते. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने त्यांची स्वप्ने अक्षरशः चुराडली.
कांद्याचे बियाणे महाग असण्यासोबतच त्याची उगवण क्षमता कमी असते. त्यातच पावसाचे अनिश्चित चक्र शेतकऱ्यांसाठी कायमचा डोकेदुखीचा विषय बनला आहे. तरीही शेतकरी जोखीम पत्करून पेरणी करतात. पण या वेळेस पावसाने शेतातील रोपांवर पाणी साचल्याने ती सडू लागली आणि पिकाचा पूर्णत: नाश झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने कांद्याची लागवड करतात. प्रथम बियाणे टाकून रोपे तयार केली जातात आणि नंतर ती उपटून नियोजित ठिकाणी लागवड केली जाते. या पद्धतीत खर्च जास्त येतो, पण कांदा टिकाऊ व दीर्घकाळ साठवणक्षम असल्याने शेतकरी हीच पद्धत पसंत करतात. मात्र, सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे ही संपूर्ण मेहनत पाण्यात गेली आहे.
शेतकऱ्यांनी शेतातील पाणी काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी पिकांचे नुकसान टाळणे जवळपास अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, पुढील हंगामाचे नियोजनही धोक्यात आले आहे.
अवकाळी पावसाने नुकतीच उगवलेली कांदा रोपे सडली आहेत. महाग बियाणे, मेहनत आणि सर्वच आशा पाण्यात गेली. शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी. - स्थानिक शेतकरी, जुन्नर तालुका