बंड गार्डन पुलाची एक बाजू बंद; नगर रस्त्यावर वाहतुक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:09 IST2025-05-09T20:08:12+5:302025-05-09T20:09:04+5:30
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

बंड गार्डन पुलाची एक बाजू बंद; नगर रस्त्यावर वाहतुक कोंडी
पुणे: बंडगार्डन येथील तारकेश्वर पुलाची एक बाजू तांत्रिक कारणामुळे बंद केल्याने शुक्रवारी (दि.९) दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. नगर रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांनी पुढील तीन दिवसांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये सिग्नल फ्री चौक, सिग्नल मध्ये उपाययोजना मात्र आता या वाहतूक कोंडीत आणखीन भर घालण्याचं काम तारकेश्वर पुलाची एक बाजू बंद केल्यामुळे झालं आहे.
तारकेश्वर पूल रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट परिसराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज लाखो वाहनांची वर्दळ या पुलावरून होत असते. मात्र सकाळी अचानक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.
तीन दिवस पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन :
नगर रस्त्याने येणाऱ्यांनी पुणे स्टेशन, स्वारगेट आणि पुढे जाणाऱ्यांसाठी ५०९ ते कल्याणी नगर, कोरेगाव पार्क या मार्गे जावे. तसेच विश्रांतवाडी, डेक्कन कॉलेज रोड, संगमवाडी या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
येरवडा येथील तारकेश्वर पुलाच्या एका एक्सपान्शन जॉईंटचे काँक्रीट लूज झाल्यामुळे लूज काँक्रीट काढून त्या ठिकाणी नवीन इपॉक्सी कॉन्क्रीट करण्यात आले आहे. सदरचे काँक्रीट सेट होण्यासाठी कमीत कमी तीन दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे तीन दिवस पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग