बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले
By नितीश गोवंडे | Updated: October 22, 2023 16:06 IST2023-10-22T16:06:01+5:302023-10-22T16:06:19+5:30
आरोपीने महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १० लाख ३० हजार ४९९ रुपये घेतले

बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले
पुणे : स्क्रॅप व्यवसायात पैसे गुंतवणुक करण्यास सांगून महिलेकडून एकाने २ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेला पुणे स्टेशन येथे सोडण्याच्या बहाण्याने बुधवार पेठेतील रेडलाईट एरियामध्ये नेले. तेथे महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष दत्तात्रय पवार (३६, रा. वेण्णा चौक, मेढा, जावली, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१८ ते २०२१ आणि २६ जून २०२२ ते २८ जून २०२२ दरम्यान महिलेच्या कांदिवली येथील घरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार आणि फिर्यादी महिलेची ओळख सोशल मीडियावर झाली. संतोषने महिलेला स्क्रॅप व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्यास सांगून दोन लाख रुपये घेतले. दरम्यान, संबंधित महिला या पुण्यात आल्या असता संतोषने त्यांना पुणे स्टेशन येथे सोडण्याच्या बहाण्याने पुण्यातील बुधवार पेठेत नेले. त्याठिकाणी महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची मागणी केली. महिलेने घाबरून पैसे दिल्यानंतर आरोपी संतोषने शुक्रवार पेठेतील मामलेदार कचेरीत नेऊन ते पैसे व्यवसायासाठी दिले असल्याचे महिलेकडून लिहून घेत नोटरी केली. यानंतरही संतोषने महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १० लाख ३० हजार ४९९ रुपये घेतले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी केली असता महिलेने त्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी संतोष पवार याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.