२२ डिसेंबरला शनिवारवाड्यावर ऐकू येईल ‘ती’चा आवाज; ‘सातच्या आत घरात’ हेच आता बास!

By संजय आवटे | Published: December 17, 2023 02:58 PM2023-12-17T14:58:07+5:302023-12-17T15:02:21+5:30

शनिवारवाड्यावर पेटेल मशाल. स्वतःसाठी, तुझी शक्ती दाखवण्यासाठी तुला सहभागी व्हायचं आहे या सेलिब्रेशनमध्ये. येणार ना?

On December 22 women will be heard at Shaniwarwada In the house within seven is now the stop | २२ डिसेंबरला शनिवारवाड्यावर ऐकू येईल ‘ती’चा आवाज; ‘सातच्या आत घरात’ हेच आता बास!

२२ डिसेंबरला शनिवारवाड्यावर ऐकू येईल ‘ती’चा आवाज; ‘सातच्या आत घरात’ हेच आता बास!

संजय आवटे
  संपादक

- ‘ती’ एकटी बाहेर पडते आणि अंधारून येतं, तेव्हा तिच्याकडं बघणाऱ्या ज्या वाईट नजरा असतात, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तिलाच घरात बसायला सांगणं हा कोणता न्याय? पुणे शहर आधुनिक असेल, तर तिथं महिला- मुलींना कोणत्याही वेळी सुरक्षित वाटलं पाहिजे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत, हे खरंच आहे; पण मुलींना हे शहर सुरक्षित वाटेल, अशी व्यवस्था आधी तयार केली पाहिजे. त्यासाठी मुळात मुलांशी बोललं पाहिजे. महिलांचा सन्मान करायला त्यांना लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे. एखादी मुलगी ‘नाही’ म्हणते, तेव्हा त्या नकाराचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे.

“Oh Woman! Anatomy is thy destiny’ अर्थात, “हे स्त्री, शरीर हीच तुझी नियती आहे”, असं पूर्वी म्हटलं जात असे. आज काळ बदलला. ती घराबाहेर पडली. चमकदार कामगिरी करू लागली. तरी शरीरात तिला बंदिस्त करण्याचा डाव आहेच. हा डाव आपल्याला उधळून लावायचा आहे. आजही ती असुरक्षित. सगळीकडं. रस्त्यावर आणि घरातही. बाहेर आणि अगदी गर्भातही.

एरव्ही गप्पा खूप मारतो आपण. स्त्री म्हणजे देवी. तिला देवी कशाला मानता? माणूसपणाचे हक्क द्या तिला. तिला विशेष अधिकार नको आहेत. बरोबरीचे अधिकार हवे आहेत. तिला ‘माणूस’ मानलं जायला हवंय. आजही ज्या देशात हुंडा दिला आणि घेतला जातो, आजही जिथं हुंड्यासाठी तिचा खून होतो, एकतर्फी आकर्षणातून तिला जिवंत जाळलं जातं, कोयता उगारला जातो, कधी ॲसिड फेकून तिला संपवलं जातं, अशा समाजाला प्रगत कसं म्हणायचं? आणि, हे असे नराधम आहेत, म्हणून तिलाच तुरुंगात ढकलायचं? तिच्यावरच बंधनं लादायची? हे बरोबर नाही. तिनं कधी घरी यावं, कधी बाहेर जावं, हे ठरवणारे तुम्ही कोण? तिच्यावर अधिकार सांगणारे तुम्ही कोण? हे बदलायला हवं.

सखे,
म्हणून, लढायचं आहे या अंधाराच्या विरुद्ध. २२ डिसेंबर ही वर्षातील सगळ्यात मोठी रात्र. त्यादिवशी शनिवारवाड्यावर पेटेल मशाल. स्वतःसाठी, तुझी शक्ती दाखवण्यासाठी तुला सहभागी व्हायचं आहे या सेलिब्रेशनमध्ये. येणार ना?

आम्ही सुरक्षित आहोतच; तुम्ही तुमच्या नजर बदला! 

सखे,
तुला तुझी ताकद दाखवावीच लागणार आहे. ज्या अंधाराची भीती दाखवतात ना हे, त्याच अंधारावर तुला मात करायची आहे. २२ डिसेंबर ही वर्षातील सगळ्यात मोठी रात्र. या रात्री तू रस्त्यावर उतरायचं. मस्त. तुला हवं तसं. तुझ्या आवडत्या कपड्यात. तुला आवडणाऱ्या दिमाखात. अशा हजारो सख्या रात्री चालतील. कोणासाठी? स्वतःसाठी. एरव्ही जगासाठी एवढं करतेस. कधी घरच्यांसाठी, कधी नातेवाइकांसाठी. आज बाहेर पड आपली ताकद दाखवण्यासाठी. या रस्त्यावर छान सेलिब्रेशन करू. रस्त्यावर नाटक, गाणी, गप्पा, शेरोशायरी, अशी धमाल असेल आणि, तुला जे आवडतं, त्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. सख्याच मशाल पेटवतील शनिवारवाड्यावर. हा असा पहिला ऐतिहासिक सोहळा ठरेल. महिला सुरक्षेची चिंता करू नका. आम्ही सुरक्षित आहोतच. तुम्ही तुमच्या नजरा बदला, हा संदेश द्यायचाय आपल्याला आणि हो, हा ‘नाइट वॉक’ फक्त महिलांचा असेल. सोबत चिमुकली मुलं असायला मात्र हरकत नाही. २२ डिसेंबरला रात्री १० वाजता अलका टॉकीज चौकात जमायचं.

Web Title: On December 22 women will be heard at Shaniwarwada In the house within seven is now the stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.