जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात आजीबाईंनी मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:39 IST2024-12-19T09:36:41+5:302024-12-19T09:39:09+5:30
सर्वांचेच दुर्लक्ष : लाडकी बहीण योजनेत समावेशाची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात आजीबाईंनी मांडला ठिय्या
पुणे : सरकारच्या लाडकी बहीण योजनेत समावेश व्हावा, अशी मागणी करत शहरातील वृद्ध महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बुधवारी दुपारी धरणे धरले. त्यांच्याकडे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिले, ना तिथे अन्य कारणांसाठी येत असलेल्या राजकारण्यांनी. आंदोलनात काही वृद्ध महिलांना त्रास होऊ लागल्याने संयोजकांनी अखेर जानेवारीत वृद्ध महिलांची मोठी परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन थांबवले.
महिला आत्मसन्मान अभियान अंतर्गत हे धरणे आंदोलन करण्यात आले. अभियानाच्या संयोजक शैलजा अराळकर यांनी या महिलांना बोलते केले. एकएक महिला स्वत:च्या व्यथा मांडत होत्या. श्रावणबाळ योजनेत अटी जाचक आहेत. कागदपत्रांसाठी खर्च जास्त असूनही त्या अटी पूर्ण होत नाहीत. लाडकी बहीण योजनेत अटी कमी, कागदपत्रं कमी, खर्च फक्त दहा रुपये, पण या योजनेत ६५ वर्षे वयापुढील महिलांना लाभ नाही, ही अट रद्द करावी, अशी मागणी त्या करत होत्या.
रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार, समाजवादी अध्यापक सभेच्या ऊर्मिला पवार, गोरख मेंगडे यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केले. आंदोलन सुरू असताना काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आले होते, मात्र धरणे आंदोलनात बसलेल्या या महिलांची दखल त्यांनी घेतली नाही. त्याची खंत संयोजक आदित्य व्यास, अरोळकर यांनी व्यक्त केली.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात येतील असे सांगितले. काही वृद्ध महिलांना त्रास होऊ लागल्याने संयोजकांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. जानेवारीत महिला परिषद आयोजित करून त्यात हीच मागणी करण्याचे ठरवण्यात आले.