अरे बापरे! मामाने स्वयंपाक करण्यास सांगितल्यावर भाच्याने चिडून केले.... असे कहीतरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 11:04 IST2021-06-07T11:04:41+5:302021-06-07T11:04:47+5:30
खेड तालुक्यातील चाकणमधील घटना, भाजी कापायच्या चाकूने केले मामावर सपासप वार

अरे बापरे! मामाने स्वयंपाक करण्यास सांगितल्यावर भाच्याने चिडून केले.... असे कहीतरी
चाकण: मामाने भाच्याला चपात्या बनवण्यास सांगितल्याने भाच्याने भाजी कापण्याच्या चाकूने मामावर सपासप वार केल्याची घटना मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथील अमृतनगर भागात घडली. चाकणपोलिसांनी या भाच्याला अटक केली आहे.
सचिन विलास देसाई ( वय २२ , रा, गोरेगाव, मुंबई ) असे अटक करण्यात आलेल्या भाच्याचे नाव आहे. या घटनेत गजानन सुरेश खैरे ( वय ३२, सध्या रा. मेदनकरवाडी) गंभीर जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन आणि सचिन हे मामा - भाचे आहेत. अमृतनगर मेदनकरवाडी येथे गजानन खैरे भाड्याच्या खोलीत राहतात. शुक्रवारी रात्री स्वयंपाक करण्याच्या वेळी मामा गजानन यांनी भाचा सचिन याला चपात्या बनविण्यास सांगितले. चिडलेल्या सचिनने चपात्या बनवण्यास नकार दिला. तसेच भाजी कापण्याच्या चाकूने मामा गजानन यांच्या पोटावर सपासप वार करून गंभीर दुखापत केली. तसेच हाताने मारहाण केली. पोलिसांनी भाचा सचिन देसाई याला अटक केली असून चाकण पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.