पुणे : मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. प्रमोद सुधाकर कांबळे (४४, रा. किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर) आणि विशाल दत्ता पारखे (४१, रा. मोहननगर, आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मुंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्यावेळी कांबळे आणि पारखे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आझाद पाटील यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कांबळे आणि पारखे यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली असता त्यात गांजा आढळून आला. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, संदीप जाधव, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रवींद्र राेकडे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.