आंदेकरच्या नातवाच्या घरी कारवाई करताना आणला अडथळा; टोळीच्या २ वकिलांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:04 IST2025-12-18T11:03:20+5:302025-12-18T11:04:15+5:30
दोन वकिलांनी कारवाई सुरु असताना घरात का घुसले? असे म्हणत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला

आंदेकरच्या नातवाच्या घरी कारवाई करताना आणला अडथळा; टोळीच्या २ वकिलांवर गुन्हा दाखल
पुणे : टोळी प्रमुख बंडू आंदेकर याचा नातू तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर यांच्या ‘हीच आईची इच्छा’ या इमारतीमध्ये घरझडती घेण्यात आली. यावेळी आंदेकर टोळीच्या दोन वकिलांनी या कारवाईला विरोध करून सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून २ पिस्तुलांसह चांदीचे दागिने, कागदपत्रे आणि रोकड असा ३७ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. ॲड. मिथुन सुनील चव्हाण आणि ॲड. प्रशांत चंद्रशेखर पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या वकिलांची नावे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे पोलिस हवालदार प्रफुल्ल बबन चव्हाण यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार मयूर भोकरे व हवालदार अमोल आवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, बंडू आंदेकर टोळीशी संपर्कात असलेल्या तन्मय गणेश कांबळे (रा. नाना पेठ, राजेवाडी) याच्याकडे पिस्टल असून ते त्याने लपवून ठेवले आहे. आंदेकर टोळीतील इतर साथीदारांसोबत मिळून काहीतरी गुन्हा करण्याच्या तो तयारीत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तन्मय कांबळे याला पकडले. त्याने हे पिस्टल अल्पवयीन मुलाकडे ठेवायला दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार स्वराज वाडेकर याच्या ‘हीच आईची इच्छा’ या चार मजली इमारतीत सोमवारी (दि. १५) घरझडती सुरू केली होती. पोलिसांनी ८० हजार रुपयांचे २ देशी बनावटीचे पिस्टल, एक एअर गन, १७ लाख १५ हजार २६० रुपयांची रोकड, १८ लाख ८४ हजार ३८९ रुपयांच्या चांदीच्या वस्तू आणि ५७ हजार ५०० रुपयांच्या इतर वस्तू असा ३७ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला.
याच इमारतीतील भाडेकरू प्रभू मारुती लोकरे यांच्या घराची झडती घेण्यात येत होती. त्याचे पंचासमक्ष ई साक्षद्वारे व व्हिडिओ शूटिंग केले जात होते. त्यावेळी दोन जण अचानक तेथे आले. त्यांनी बंडू आंदेकर आमचे अशील असून तुम्ही लेडीजच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये का घुसले?, असे विचारले. यावर पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी त्यांना चालू असलेली कारवाई ही कायदेशीर असून आम्हाला आमचे काम करू द्या. यावर जोरजोराने बोलून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी ॲड. मिथुन चव्हाण व ॲड. प्रशांत पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते पुढील तपास करत आहेत.