आता नागरिकांचा मदतीने होणार पुणे जिल्ह्याचा पर्यटन विकास;पुणे जिल्हापरिषदेची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:21 IST2021-06-23T18:19:42+5:302021-06-23T18:21:37+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी करार करण्याचा देखील विचार

आता नागरिकांचा मदतीने होणार पुणे जिल्ह्याचा पर्यटन विकास;पुणे जिल्हापरिषदेची संकल्पना
एखाद्या पर्यटन स्थळावर गेल्यावर तुम्हालाही कल्पना सुचतात का? आता या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात.पुणेजिल्हा परिषदेचा वतीने पर्यटन विकासासाठी आता थेट नागरिकांमधून सूचना मागवण्यात आल्या आहेत.या संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत काही प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. मात्र या सगळ्याच पर्यटन स्थळांचा पूर्णपणे विकास झालेला नाही. या पर्यटन स्थळांवर नव्याने काय संकल्पना राबवता येऊ शकतात यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.जिल्हा परिषदेचा वतीने आता थेट नागरिकांकडून सूचना मागवल्या जात आहेत. यामध्ये अगदी ॲग्रो टूरिझम,क्रीडा पर्यटन पासून ते मेडिकल टूरिझम चा देखील समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या गूगल फॉर्म चा माध्यमातून नागरीक थेट त्यांचा सूचना मांडू शकतात.
याच बरोबर या पर्यटन क्षेत्राचा विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावं यासाठी पुणे विद्यापीठाची मदत घेण्याचा विचार जिल्हा परिषदेचा वतीने करण्यात येत आहे.या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.