पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:35 IST2025-12-10T18:35:09+5:302025-12-10T18:35:52+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भैरोबानाला- हडपसर ते यवत असा सहा पदरी मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने उड्डाणपूल करताना मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात यावी, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत

पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस
पुणे: पुणे -सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणारा उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाला ते यवत असा उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पायाभूत समितीने या प्रकल्पाला मंगळवारी मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून भैरोबानाला- हडपसर ते यवत असा सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. याच मार्गात मेट्रोसाठीही तरतूद करण्यात येणार आहे.
पुणे - सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून हडपसर ते यवतपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाल्याने या दरम्यान वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी बराच वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हडपसर ते यवत दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. जूनमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता दिली होती. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात करून तो रस्ता ही सहा पदरी करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत समितीची बैठक झाली. त्यामध्ये सोलापूर रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी हडपसर ऐवजी भैरोबानाला येथून उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, यावर चर्चा करून त्यास मान्यता दिली. त्यामुळे उड्डाणपुलाची लांबी सुमारे साडेचार किलोमीटरने वाढणार आहे, अशी माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे ३९ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल होणार आहे. या प्रकल्पासाठी पाच हजार २६२ कोटींच्या खर्चास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. हे काम बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर या रस्त्यावर सर्व वाहनांसाठी टोल आकारण्यात येणार आहे. निविदा काढून हे काम दिल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीला कामाची ‘वर्क आॉर्डर’ दिल्यानंतर तीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.
मेट्रोचाही समावेश करण्याच्या सुचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच बैठकीत या मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल करताना मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात यावी, अशा सुचनाही दिल्या आहेत. शहरातील पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असून भविष्यात भुयारी मार्गांचेही जाळे उभारण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.