आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:50 IST2025-05-08T12:49:20+5:302025-05-08T12:50:09+5:30
कितीही समविचारी पक्षांबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही तडजोडी या कराव्याच लागतात व अशा तडजोडी करण्याचा आपचा स्वभाव नाही

आता महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढायची; 'आप'च्या कार्यकर्त्यांची तयारी, इंडियाबरोबरचा अनुभव नकोसा
पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीपासून बाजूला रहात इंडिया आघाडीला मदत करणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पक्षाकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही, मात्र पक्षाच्या पुण्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेच मत व्यक्त केले.
पक्षाने मागील काही वर्षात पुणे शहरात युवक कार्यकर्त्यांचे चांगले संघटन तयार केले आहे, मात्र ते पक्षासाठी निवडणुकीकरिता वापरण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही. कारण लोकसभा निवडणुकीत आपने इंडिया आघाडीला लोकसभेची एकही जागा न घेता पाठिंबा जाहीर केला. पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. विधानसभा निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षाने फक्त पाठिंबाच जाहीर केला.
या दोन्ही निवडणुकांमध्ये घटक पक्षांकडून आलेला अनुभव फारसा चांगला नव्हता असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रचार सभांमध्ये बोलण्याची संधी न देणे, पत्रकांमध्ये पक्षाचे नाव न टाकणे अशा अनेक गोष्टी झाल्या. त्यामुळेच आम्हाला आता आमची ताकद अजमावून पहायची आहे, असे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
असे निर्णय वरिष्ठ स्तरावर होत असतात, मात्र आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी असे वाटते हे खरे आहे. कितीही समविचारी पक्षांबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही तडजोडी या कराव्याच लागतात व अशा तडजोडी करण्याचा आपचा स्वभाव नाही. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेच यासंबंधीचा निर्णय घेतील.- मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ते