मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने दोषी ठरवलेले नाही, ते राजीनामा कशासाठी देतील?
By राजू इनामदार | Updated: January 21, 2025 19:42 IST2025-01-21T19:40:02+5:302025-01-21T19:42:14+5:30
ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यांचा प्रतिप्रश्न

मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने दोषी ठरवलेले नाही, ते राजीनामा कशासाठी देतील?
पुणे: मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही यंत्रणेने दोषी ठरवलेले नाही, ते राजीनामा कशासाठी देतील? असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मस्साजोग हत्या प्रकरणात मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली. पालकमंत्ऱ्यांच्या दोन पदांना स्थगिती दावोसहून दिली गेली आहे, मात्र त्यात विशेष काही नाही असे सांगत त्यांनी पालकमंत्रीपदावरून युती सरकारमध्ये वाद असल्याबाबतच्या टिकेला नकार दिला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या नियोजित कार्यक्रमासंदर्भात वळसे मंगळवारी दुपारी साखर संकुलमध्ये आले होते. बैठकीनंतर पत्रकारांना त्यांनी त्या कार्यक्रमाची माहिती दिली. मुंडे यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत ते म्हणाले, “त्यांना कोणत्याही सरकारी यंत्रणेने किंवा न्यायालयानेही दोषी ठरवलेले नाही. चौकशी करणारी यंत्रणा वेगळी आहे. एसआयटी मार्फत ही चौकशी होत आहे, त्यात सत्य काय आहे ते बाहेर येईल. त्याआधीच मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही.
बीड चे पालकमंत्री अजित पवार झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांना नक्की शिक्षा होईल.”
माजी मंत्री असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ वेगळा विचार करतील असे वाटत नाही. त्यांची काही नाराजी असेल तर ते पक्षाच्या नेत्यांबरोबर बोलतील, नेते त्यांच्याबरोबर संपर्क साधतील. त्यांची समता परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवणार असेल तर ते माहिती नाही, मात्र ते वेगळा विचार नक्की करणार नाहीत असा विश्वास वळसे यांनी व्यक्त केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण २३ जानेवारीला होईल. ज्येष्ठ नेते व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही यावेळी उपस्थित असतील. याच कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांना पारितोषिक वितरणही करण्यात येणार आहे असे वळसे यांनी सांगितले.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत का? त्यांना निमंत्रण दिले आहे का? या प्रश्नावर वळसे यांनी संस्थेच्या वतीने बहुधा त्यांना निमंत्रण पोहचलेले नाही असे सांगितले. त्यांना निमंत्रण दिले जाईल असे ते म्हणाले.