युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:25 IST2025-07-09T16:23:15+5:302025-07-09T16:25:44+5:30
राज यांच्या एका आदेशामुळे ती चर्चा थांबली असून आता ‘हे पुन्हा नवीन काय करणार? युती करतील की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल
पुणे: युतीसंबधात माझ्याशिवाय अन्य कोणीही समाजमाध्यमांवर व्यक्त व्हायचे नाही, प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही अशी तंबी देणारा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाबरोबरच खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. आपण नक्की करायचे तरी काय? असा प्रश्न मनसैनिकांसमोर आहे तर या लहरीपणाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त व्हायचे अशी चिंता शिवसैनिकांना भेडसावते आहे.
मुंबईत झालेल्या मराठी भाषा विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे ‘आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, आता गद्दारांना पळवून लावू’ असे तिखट भाष्य केले होते. राज ठाकरे यांनी मात्र त्यांच्या भाषणात फक्त मराठीचाच मुद्दा आळवला होता. या दोन भावांच्या एकत्रिकरणाला मेळाव्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच राज यांच्या भाषणात स्पष्टता नसूनही राज्यभरात शिवसेना- मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू होती. राज यांच्या एका आदेशामुळे ती चर्चा थांबली असून आता ‘हे पुन्हा नवीन काय करणार? युती करतील की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काहीजणांनी ‘ही तर भारतीय जनता पक्षाचीच खेळी’ असा राजकीय शोध लावला आहे. त्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली होती असे बोलले जात आहे. अशा प्रकारच्या राजकारणात फडणवीस प्रविण असल्याचे दाखले त्यासाठी दिले जात आहेत. मेळाव्यानंतर राज यांच्यावर भाजपच्या परराज्यातील मंत्ऱ्यांकडून टीका केली जात आहे, मात्र राज्यातील भाजपच्या मंत्ऱ्यांपासून अनेक पदाधिकारी उद्धव यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळेच ही भाजपची खेळी असल्याच्या टीकेला पुष्टी मिळत आहे.
मेळाव्याला मुंबईत तर प्रतिसाद मिळालाच, पण राज्यातूनही अनेकांनी या एकत्रिकरणाचे स्वागत केले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन लढल्यास निवडणुकीत चांगले यश मिळेल असा विश्वास त्यातून शिव-मनसैनिकांमध्ये निर्माण झाला होता. निवडून येण्याची शक्यता वाढल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मुंबईनंतर ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना व मनसेची चांगली राजकीय शक्ती आहे. पुण्यातही अनेकांनी या युतीचे स्वागत केले होते. स्वतंत्र लढल्यास मतांची विभागणी होऊन नुकसानच होते याचा अनुभव याआधीच्या महापालिका निवडणुकीत इच्छुकांनी व पदाधिकाऱ्यांनीही घेतला आहे. राज यांच्या आदेशाने त्यावर पाणी पडले आहे.
आम्हाला असा कोणताही आदेश नाही. आमचे पक्षप्रमुख घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. कोणी बरोबर असो अथवा नसो, शिवसेना कायमच निवडणुकीसाठी सज्ज असते.- संजय मोरे- शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे)
राज यांच्या आदेशानंतर मनसेचे कोणीही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी संभाव्य युतीबाबत जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र बहुतेकांना ही युती हवी असल्याचेच दिसते आहे. विशेषत: पुण्यामधील मनसैनिकांना युतीकडून आशा आहेत.