कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अधिकाऱ्यांना इशारा, पुण्याचे महापौर ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:04 IST2026-02-12T10:01:15+5:302026-02-12T10:04:17+5:30
शहरातील पावसाळी कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्यासह मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अधिकाऱ्यांना इशारा, पुण्याचे महापौर ॲक्शन मोडवर
पुणे : नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील पावसाळी कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्यासह मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत, तर उपमहापौरांनी बुधवारी (दि. ११) सकाळी ६ वाजता औंध-बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फिल्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली.
महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सोमवारी झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापौरपदी भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि उपमहापौरपदी रिपाइंचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर महापौर आणि उपमहापौरांनी मंगळवारी मुंबईला जाऊन विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर निवडीच्या तिसऱ्याच दिवसी महापौर आणि उपमहापौरांनी ॲक्शन मोडवर येत काम सुरू केले आहे. महापौर नागपुरे यांनी पावसाळी कामांवर लक्ष केंद्रित करत ३१ एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यापूर्वी महापालिकेच्या उदासीन कारभाराचा फटका शहराला बसला आहे. वेळेवर नालेसफाई झाली नव्हती. परिणामी अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतूक कोंडी, वाहनांची हानी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिली. तसेच मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पावसाळ्यातील सुरक्षेचा सविस्तर अहवाल येत्या तीन दिवसांत महापौर कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
उपमहापौरांची औंध-बोपोडी प्रभागाची पाहणी
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता औंध-बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फिल्डवर उतरून ड्रेनेज लाइन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह, रस्त्यांची दुरवस्था तसेच पथदिवे यासंदर्भातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या सर्व समस्यांवर तातडीने व प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.