बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गडकरींचे कौतुक मात्र भाजप अन् आघाडीत 'तू तु मै मै'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 19:03 IST2022-03-20T19:02:41+5:302022-03-20T19:03:08+5:30
बारामती परिसरातील महत्वाच्या मार्गासाठी नितीन गडकरी यांनी ७७८ कोटी रुपये मंजूर केले

बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गडकरींचे कौतुक मात्र भाजप अन् आघाडीत 'तू तु मै मै'
बारामती : राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये 'तू तु मै मै 'सुरू असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. बारामती परिसरातील महत्वाच्या मार्गासाठी गडकरी यांनी ७७८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. विकासकामे करताना राजकारण बाजूला ठेवण्याच्या गडकरींची भूमिका बारामतीकरांना भावली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी स्वतः ट्वीट करत या मंजुरीची माहिती दिली आहे .हे ट्वीट आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर शेअर करत त्यांना धन्यवाद दिले आहेत. उंडवडी कडे पठार ते बारामतीतील देशमुख चौक व ढवाण पाटील चौक ते फलटणपर्यंत या दोन रस्त्यांसाठी ७१८ कोटी १८लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही मार्गांना भरघोस निधी मिळाल्याने परिसरातील रहदारीला वेग येणार आहे. पुण्यासह आसपासच्या तीन जिल्ह्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे
ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचाच हा टप्पा आहे. उंडवडी कडे पठार ते बारामती शहरातील देशमुख चौक रस्ता चौपदरी डांबरी करण्यात येणार आहे. यामध्ये दुभाजक असणार आहे. तसेच बारामती ते थेट फलटणपर्यंत ३३ कि. मी. अंतर रस्ता चार पदरी सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासाठी अगोदरच भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात हे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. बारामती साठी हे दोन्ही प्रकल्प महत्वपूर्ण आहेत. त्याच्या पूर्णत्वानंतर येथील अर्थकारणाला आणखी चालना मिळणार आहे. विकासकामांमध्ये राजकारण आणायचे नसते हे गडकरी यांनी आजच्या निर्णयाने सिद्ध केले आहे. धन्यवाद गडकरी साहेब',अशा शब्दात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त झाले आहेत.