नितीन गडकरी म्हणजे धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते; फडणवीसांचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:32 IST2025-08-02T10:31:50+5:302025-08-02T10:32:55+5:30
गडकरी हे सर्वथा योग्य व पात्र आहेत, धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे ते नेते आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले.

नितीन गडकरी म्हणजे धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे नेते; फडणवीसांचं विधान चर्चेत
पुणे : लोकमान्य टिळक यांच्यासारख्या भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या थोर व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळावा यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे सर्वथा योग्य व पात्र आहेत, धडाडीच्या निर्णयांना मूर्त स्वरूप देणारे ते नेते आहेत, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडकरी यांचे कौतुक केले. ‘दादा’ या एकाच शब्दावर पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे, पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी झाली. त्यामध्ये ‘दादा’ म्हणूनच परिचित असलेले उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांची गोची झाली. मात्र, कार्यक्रम रंगतदार झाला.
सूत्रसंचालिकेने कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांनाही ‘दादा’ म्हणत असत अशी माहिती देत भाषणासाठी म्हणून अजित पवार यांना बोलावले. त्यांनी, सूत्रसंचालिका पुण्याच्याच आहेत ना? असे म्हणत, आमचे चंद्रकांत दादा काही अजून पुणेकर झालेले नाहीत, अशी मल्लिनाथी केली. त्यावर बसल्या जागेवरूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्ही त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही, त्यामुळे तसे झाले, असे सांगितले. पवार यांनीही त्यांना लगेचच, मला पालकमंत्री करत असाल तरच तुमच्याकडे येतो असे मी तुम्हाला सांगितले होते, असे प्रत्युत्तर दिले. माझ्या आधी चंद्रकांत ‘दादा’च पालकमंत्री होते याचीही आठवण त्यांनी करून दिली.
गडकरी फक्त यशस्वी राजकारणीच नाहीत तर यशस्वी उद्योजक, यशस्वी शेतकरीही आहेत, असे पवार म्हणाले. ते नेहमीच पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतात. त्यांचे विकासकामांकडे कायम लक्ष असते. सतत फोन करत असतात. इतर नेत्यांमध्ये दिसतो तसा अहंकार, आक्रस्ताळेपणा त्यांच्यामध्ये औषधालाही नाही. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार असलेला विनय आहे. हा फक्त गडकरी यांचा गौरव नाही तर विनयशील, संवेदनशील, विवेकशील नेतृत्वाचा गौरव आहे असे पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाची सुरुवातच ‘चंद्रकांत दादांना कोल्हापूरला पाठवणार आहात की काय? अशी केली. सभागृहात त्यामुळे हास्यकल्लोळ झाला. सच्चा आणि दिलदार नेता अशा शब्दांमध्ये गडकरी यांचा गौरव करत शिंदे म्हणाले, गडकरी रोडकरी, पुलकरी व आता कोर्ट बांधतात तर कोर्टकरी आहेत. महायुतीचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शकही आहेत. ठाण्यातून येत होतो तिथे एका चौकात नितीन जंक्शन आहे. तिथला रस्ताही गडकरी यांनीच बांधला आहे. विकासाचा महामेरू असे त्यांना म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनाही त्यांच्या भाषणाची सुरुवात ‘दादा’ शब्दानेच केली. जे कधीही ‘दादागिरी’ करत नाहीत ते ‘दादा’ असे त्यांनी चंद्रकात पाटील यांच्याकडे पाहून म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्याचबरोबर, काहींचे व्यक्तिमत्त्वच असते की त्यांनी नुसते पाहिले तरी दादागिरी वाटते, अशी पुस्ती त्यांनी अजित पवार यांच्याकडे पाहून जोडली. जो बाणा टिळकांचा होता तोच गडकरींचा आहे असा गौरव करून फडणवीस म्हणाले, काही वर्षांपूर्वी पायाभूत सुविधा पाहायला आपले लोक जगात जात होते, आता जगातील लोक आपल्याकडे येतात. ते नेहमीच आजच्यापेक्षा २० वर्षे पुढचे पाहतात. देशातील स्थापत्य कामांचा गुणात्मक वेग त्यांनी वाढवला. इथेनॉलवर गाड्या चालतील हे त्यांनी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांना सांगितले होते. अटलजींनी त्यांना त्याच वेळी याचे धोरण तयार करायला सांगितले. त्यासाठी ते ब्राझीलला जाऊन आले. या पुरस्कारासाठी ते सर्वाधिक पात्र व्यक्ती आहेत.
लोकमान्य हा जीवनभराचा प्रेरणास्रोत : नितीन गडकरी
पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना नितीन गडकरी यांनी आपल्या मनात आनंद व संकोच अशा दोन्ही भावना असल्याचे सांगितले. लोकमान्य हा जीवनभराचा प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळतो आहे याचा आनंदच आहे. याने आता जबाबदारी वाढली आहे. सर्वांची भाषणे ऐकल्यानंतर त्यांनी केलेले गुणवर्णन ऐकून संकोचही वाटत आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच त्यांना आलेल्या चिठ्ठीचा संदर्भ देत ते म्हणाले, सुरत, गुवाहाटी इथले रस्ते गडकरी यांनी बांधले म्हणून तिकडे गेले का असे या चिठ्ठीत विचारले आहे. गडकरी यांनी त्यावर बसल्या जागेवरूनच तुमच्या हॉटेलसमोरचा रस्ता आम्हीच बांधला आहे असे सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.