निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:59 IST2025-05-27T09:59:25+5:302025-05-27T09:59:55+5:30
पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार

निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान
बारामती - बारामती तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. एकीकडे शेतकऱ्यांवर आसमानी संकट घोंगावत असतानाच, निरा डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. केवळ पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पाटबंधारे खाते झोपा काढतंय का? असा सवाल येथील संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
रविवारी दुपारी २ च्या सुमारास येथील निरा डावा कालवा फुटला. यावेळी कालवा तुडुंब भरून वाहत होता. अचानक फुटल्याने कालव्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह शेतकऱ्यांच्या शेतात, घरात घुसला. या पाण्यात शेती वाहून गेली. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्यासह संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले.
उपहारगृह देखील पाण्याखाली गेले. त्यामुळे येथील शेतकरी, नागरिक, व्यावसायिकांनी भर पावसात रात्र अक्षरशः जागून काढली. केवळ पाटबंधारे खात्याच्या उदासीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे येथील शेतकरी आणि व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत. या पाण्यात अनेक वाहने देखील अडकली. कालव्याचा मलबा आणि चिखल नागरिकांच्या घरात गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असताना, कालव्यात सोडलेल्या पाण्याचा प्रवाह कमी करणे अपेक्षित होते. कालव्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे आणि ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे निरा डावा कालवा फुटला. भराव खचलेल्या ठिकाणीच कालवा फुटला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालव्याची अनेक दिवसांपासून पाहणीच केली नसल्याचे उघड झाले आहे.
"शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. नंदा सुरेश काटे, महादेव काटे, राजेंद्र काटे, अरुण काटे, दिलीप काटे, नारायण काटे, सोमनाथ विजय काटे व इतर यांच्याही घरात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे कन्हेरीचे माजी सरपंच सतीश काटे यांनी सांगितले. घरातील टीव्ही, फ्रिज, धान्य, किराणा, बाजाराचे साहित्य, भांडी पाण्यात वाहून गेले. या लोकांचा संपूर्ण प्रपंच उध्वस्त झाला आहे.
तर नलिनी काटे, सचिन काटे, नितीन काटे, सतीश काटे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच सतीश काटे यांनी केली आहे. काल पावसाचा वेग प्रचंड होता. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. या परिसरात कॅनल माळरानालगत आहे. गेले चार दिवस पाऊस पडत असल्याने माळावरील पाणी कालव्यात आले. त्यामुळे कालवा ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यातच भराव खचल्यामुळे कालवा फुटला. त्यामुळे मोठे नुकसान झाले, असे छत्रपती संस्थेचे माजी संचालक संतोष ढवाण पाटील यांनी सांगितले.