नऊ वर्षाच्या चिमुकलीचे ७८ वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण; मुळशीतील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 20:51 IST2023-03-15T20:51:17+5:302023-03-15T20:51:28+5:30
वृद्धत्वाच्या नात्याला काळीमा फासणाऱी ही घटना समजल्यावर विविध स्तरातून त्याचा निषेध करण्यात येतोय

नऊ वर्षाच्या चिमुकलीचे ७८ वर्षीय नराधमाकडून लैंगिक शोषण; मुळशीतील संतापजनक घटना
पौड : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय वृद्ध नराधमाने बलात्कार केल्याची घटना आंदेशे (ता.मुळशी) येथे घडली. संतोबा वाघू कंधारे (वय 78, रा.आंदेशे,ता.मुळशी) असे या नराधमाचे नाव असून त्याला पौड पोलिसांनीअटक केली आहे. तथापि नातीच्या वयासमान असलेल्या चिमुरडीवर वृद्धाने केलेल्या अत्याचाराचा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी - अत्याचारीत चिमुरडी बौद्ध समाजातील असून इयत्ता दुसरीत शिकते. कंधारे त्यांच्या घराशेजारी राहतो. त्याची मुले पुण्यात राहत असून तो घरी एकटाच राहतो. कंधारे याने या मुलीला कॅडबरी, चॉकलेट, कुरकुरे या खाऊच्या पदार्थाचे आमिष दाखवले. गोड बोलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पौड पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले हे पुढील तपास करीत आहे. तथापि ही घटना तालुक्यात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वृद्धत्वाच्या नात्याला काळीमा फासणाऱी ही घटना समजल्यावर विविध स्तरातून त्याचा निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा संघटीका स्वाती ढमाले यांनी पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना निवेदन देवून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीनेही या घटनेचा निषेध केला गेला.