पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, कार आणि एसटीच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:53 IST2025-01-17T12:27:48+5:302025-01-17T12:53:45+5:30
पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, कार आणि एसटीच्या धडकेत नऊ जणांचा जागीच मृत्यू
Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी कंटेनरने वाहनांना धडक दिल्यानंतर आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मागून येणाऱ्या एका ट्रकने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कार ही एका एसटी बसवर जाऊन आदळली. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यातील नारायणगाव परिसरात झालेल्या एका अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या एका ट्रकने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आणि नंतर ती बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
Nine people died in a road accident in the Narayangaon area of Pune. The accident occurred after a truck dashed a car from behind which further collided with a bus (which was stationed)...More details awaited: Pune Rural Police SP Pankaj Deshmukh
— ANI (@ANI) January 17, 2025
कसा घडला अपघात?
पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळील मुक्ताई ढाब्यानजीक हा भीषण अपघात सकाळी दहाच्या सुमारास झाला. सकाळी नाशिकहून पुण्याच्या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसचा नारायणगावजवळ ब्रेक फेल झाला. त्यामुळे ती एसटी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी मागून प्रवासी वाहतूक करणारी एक मॅक्झिमो गाडी येत होती. त्याच्या पाठीमागून एक आयशर ट्रक भरधाव वेगाने येत होता. भरधाव आयशरने प्रवासी असलेल्या मॅक्झिमो गाडीला भीषण धडक दिली. त्यानंतर मॅक्झिमो गाडी बंद पडलेल्या एसटीवर जोरात जाऊन आदळली. या मॅक्झिमो गाडीमध्ये जवळपास १३ प्रवासी होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक पसार झाला आहे. हा ट्रक हरियाणा इथला असून त्याच्या चालकाचा शोध घेतला जात आहे. सकाळी अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी मदतकार्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. जखमींना सध्या नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आयशर आणि बसदरम्यान सापडल्याने मॅक्झिमा कारचा चक्काचूक झाला. प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याची धडक मॅक्झिमोला बसली.