कोथरूड प्रकरणात नवीन वळण; 'सिव्हिल कपड्यातील' व्यक्ती कोण? पोलिसांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:46 IST2025-08-05T15:45:09+5:302025-08-05T15:46:12+5:30
पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा

कोथरूड प्रकरणात नवीन वळण; 'सिव्हिल कपड्यातील' व्यक्ती कोण? पोलिसांना थेट सवाल
पुणे - पोलिसांनी कोथरूड ठाण्यात तीन मुलींना जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल १२ तासांपेक्षा जास्त वेळ घेऊन ही घटना वस्तुस्थितीवर आधारित नसून गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आयुक्तालयाकडून सहकाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप आता आंदोलकांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून एक विवाहित तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली. मैत्रिणींच्या मदतीने कोथरूड येथे राहणाऱ्या तीन तरुणींच्या फ्लॅटमध्ये तिने आश्रय घेतला आणि काही काळाने निघूनही गेली. याच कारणामुळे, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात येऊन कोथरूड पोलिसांच्या मदतीने वॉरंट नसतानाही मुलींच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्यांनी मुलींच्या सामानाची तपासणी केली आणि त्यांना कोथरूड पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत पाच तास बसवून ठेवले. या खोलीत त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला.
या प्रकरणाची दखल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी या मुलींसह रोहित पवार, सुजात आंबेडकर यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते रविवारी मध्यरात्रीनंतरही पोलिस आयुक्तालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आमदार पवार यांनी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांकडून लेखी देण्यात आले आहे.
‘तो’ साध्या वेशातील कोण?
कोथरूड येथील मुलींच्या फ्लॅटवर पोलिसांसोबत एक साध्या वेशातील व्यक्तीदेखील आली होती, अशी माहिती मुलींनी दिली. ती व्यक्ती कोण? महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलिस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या, पोलिस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत, या व्यक्ती पोलिस दलातील कुणाशी संबंधित आहेत? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.