नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:52 IST2025-01-25T10:52:01+5:302025-01-25T10:52:45+5:30
रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत

नव्या गाड्या, नवीन थांबा सुरु करा; सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करा, समिती सदस्यांची मागणी
पुणे: नवीन रेल्वेगाडी सुरू करणे, नवीन थांबा सुरू करणे, सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार अशा विविध मागण्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी केल्या. त्यावेळी पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी मागण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, रेल्वेचे सुरक्षित आणि वेळेवर संचलन, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहे. प्रवासी सुविधा चांगल्या देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीची पहिली बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीचे समन्वय वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक रामदास भिसे उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि समस्यांबाबत सूचना दिल्या. रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. वर्मा यांनी समस्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी नंदकुमार पाटील, राहुल मुथा, विनीत पाटील, ऋतुराज काळे, राम जोगदंड, राज कुमार नहार, रणजित श्रोगोड, गोरख बारहाटे आणि रफिक खान आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवनाथ बियाणी यांची प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती (झेडआरयूसीसी) सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांनी आभार मानले.
या मागण्या
-पुणे ते साईगर शिर्डी, साईनगर शिर्डी ते पंढरपूर, मनमाड ते पुणे अशी नवीन गाडी सुरू करणे.
- बेलापूर स्थानकावर हॉलिडे स्पेशलचा थांबा.
- सह्याद्री एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करावा.
- राहुरी येथे नवीन गाडी सुरू करणे.
-पुणे-अमरावती आणि दादर-शिर्डी दादर रेल्वे स्थानकावर थांबा, बेलापूर स्थानकाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक असे नामकरण, बेलापूर मालगाडीचे शेड स्थलांतर, कोल्हापूर/बेळगाव ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस धावणे.