बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:59 IST2024-12-21T14:58:00+5:302024-12-21T14:59:19+5:30

ध्वनिप्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा पुढाकार

New Municipal Corporation regulations for construction projects! | बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली !

बांधकाम प्रकल्पासाठी महापालिकेची नवी नियमावली !

पिंपरी : शहरामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण वाढते आहे. याचबरोबर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामांची संख्या सुद्धा वाढत असून, महापालिकेने नागरिकांना चांगले जीवनमान देण्याच्या हेतूने शाश्वत आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती स्वीकारली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गुरुवारी (दि.१९) याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले.

नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून आणि क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या संस्थेसोबत उपापयोजना चर्चा करून ठरविण्यात आल्या आहेत. शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी या नवीन नियमांमध्ये ध्वनिप्रदूषण, जलसंधारण आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
 
रात्रीच्या बांधकामांवर बंदी...

शहरातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर रात्री १० ते सकाळी ७ या वेळेमध्ये पिंपरी-चिंचवड हद्दीतील बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच सर्व नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी वैयक्तिक पाणी मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पाण्याच्या वापराचा वैयक्तिक स्तरावर मागोवा घेता येणार असून, यामाध्यमातून पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे. याशिवाय, गृहनिर्माण युनिट्समध्ये बांधकाम व्यावसायिकांनी घराचा ताबा देताना एरेटर टॅप्स बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

बांधकाम कचरा व्यवस्थापनावर भर...

महापालिकेने बांधकाम आणि बांधकाम पाडणीच्या कचऱ्यासाठी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे व्यवस्थापन केले आहे. नवीन नियमांनुसार बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पातून मिळणाऱ्या किमान १० टक्के पुनप्रक्रिया केलेल्या वस्तू म्हणजेच पेवर ब्लॉक सारख्या रचना नसलेल्या वस्तू वापरासाठी घेणे बंधनकारक असेल. सदर परिपत्रकाचे बांधकाम व्यवसायिकांनी पालन न केल्यास त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार नाही. असा सुद्धा नियमावलीमध्ये उल्लेख केला आहे.

नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत शहरी विकासासाठी आम्ही ही पावले उचलत आहोत. जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपायांवर भर देऊन आम्ही भविष्यासाठी व शाश्वत शहर निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

Web Title: New Municipal Corporation regulations for construction projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.