पुणे: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल तपासातून आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे आरोपीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीची दोन वर्षांतली फोनची कुंडली काढली असून, त्यात त्याचा स्वारगेट बस स्थानकच नव्हे, तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बस स्थानक परिसरात मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. इतर बस स्थानकांच्या तुलनेत तो स्वारगेट बस स्थानकातच अधिक काळ वावरला असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा परिसर ही गर्दीची ठिकाणे त्याने हेरली होती. या परिसरात महिला आणि पुरुष प्रवाशांची सतत वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेऊन गाडे हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गाडेची कुंडली काढली असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. ३) या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांकडून हा गुन्हा गुन्हे शाखेने आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गाडे हा स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात असून, कागदपत्रांची पूर्तता आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुन्हे शाखा बुधवारी (दि. ५) त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरोपी गाडे याने वाहक असल्याची बतावणी करून तरुणीला एका शिवशाही बसमध्ये नेले. दरवाजा लावून जिवे मारण्याची धमकी देत दोनदा बलात्कार केला. या घटनेनंतर गाडे पसार झाला. या घटनेने पुणे शहर हादरून गेले. महाराष्ट्रातही या घटनेचे पडसाद उमटले. यानंतर आरोपी गाडे याच्याविरोधात तपासातून नवीन गोष्टी समोर येत आहेत. स्वारगेटच नव्हे, तर इतर बस स्थानकातही गाडेचा वावर होता, असे तपासातून पुढे आले आहे.
सध्या गाडे याच्याविरुद्ध तांत्रिक, तसेच वैद्यकीय पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आहेत. त्याची वैद्यकीय, तसेच लैंगिक क्षमता तपासणी करण्यात आली आहे. ज्या बसमध्ये त्याने बलात्कार केला, ती संबंधित बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ताब्यात घेतली आहे. गाडे याने त्याचा मोबाइल फेकून दिला आहे. मोबाइल जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचे मोबाइल संभाषण, तसेच त्याअनुषंगाने तांत्रिक तपास करण्यात येत आहे. त्याच तपासात गाडे स्वारगेट बरोबरच इतर बस स्थानकांत फिरत असल्याचे समोर आले आहे. एकंदर मिळालेली माहिती पाहता, गाडे याने आपल्या गुन्हेगारी कृत्यासाठी बस स्थानके हेरून ठेवली होती. जशी संधी मिळेल, तशी तो गुन्हेगारी कृत्य करत होता, असे दिसून येते.