'केंद्राने सुडबुद्धीने कारवाई केली'; बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 14:11 IST2021-10-09T13:50:55+5:302021-10-09T14:11:34+5:30
राज्यात आयकर विभागाकडून अजित पवार (ajit pawar) यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला.

'केंद्राने सुडबुद्धीने कारवाई केली'; बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित निकटवर्तीय आणि संस्थांवर आयकर विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्र सुरु आहे. केंद्र सरकारने सुडबुध्दीने ही कारवाई केल्याचा आरोप करीत शनिवारी(दि ९) राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्राचा निषेध करीत 'अजितदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्यात आयकर विभागाकडून पवार यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्राच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी महिलाच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड, तालुकाध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा आरती शेंडगे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बाजार समितीचे वसंतराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य विश्वास देवकाते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
शहरातील भिगवण चौकात हुतात्मा स्तंभाजवळ सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. यावेळी मुख्य चौकातच गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवर देखील परीणाम झाल्याचे चित्र होते.